ICC T20 World Cup : भारत-इंग्लंड आज भिडणार; कुणाला मिळणार फायनलचे तिकीट?

ICC T20 World Cup : भारत-इंग्लंड आज भिडणार; कुणाला मिळणार फायनलचे तिकीट?

एडिलेड |

आयसीसी टी २० वर्ल्डकप (ICC T20 World Cup) क्रिकेट स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना आज गुरुवारी एडिलेड मैदानावर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता खेळवण्यात येणार आहे...

आयसीसी टी २० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने सुपर १२ लढतींमध्ये ५ सामन्यांमध्ये ४ विजय १ पराभवासह ८ गुणांची कमाई करताना अव्वल स्थान पटकावलं आहे. इंग्लंड संघाला ५ सामन्यांमध्ये ३ विजय मिळवता आले आहेत.

तर १ सामना अनिकाली लागला आहे. इंग्लंड संघाने ७ गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावलं आहे. भारत आणि इंग्लंड संघांमध्ये २२ सामने झाले आहेत. यात भारताने १० तर इंग्लंड संघाने १२ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. टी २० वर्ल्डकप स्पर्धेत झालेल्या ३ सामन्यांमध्ये भारताने २ तर इंग्लंड संघाने १ विजय नोंदवला आहे.

मात्र या महत्वपूर्ण सामन्यापूर्वी इंग्लंड संघाला २ महत्वपूर्ण धक्के बसले आहेत. जलदगती गोलंदाज मार्क वूड आणि आणि डेविड मलान दुखापतग्रस्त असल्यामुळे उद्याच्या सामन्यात मुकण्याची शक्यता आहे.

दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सामन्याचा तयारीसाठी नेट्समध्ये सराव करताना दुखापत झाली होती. पण दोघेही उद्याच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. दोन्ही फलंदाजांची दुखापत गंभीर नाही. त्यामुळे भारतीय संघाच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

इंग्लंडविरुद्ध सामन्यासाठी भारतीय खेळाडू कसून सराव करत आहेत त्यामुळे अंतिम ११ खेळाडू निवडताना रोहित शर्माला कस लागणार आहे. मागील ५ सामन्यांमध्ये दिनेश कार्तिक आणि रिषभ पंतला अंतिम ११ मध्ये संधी देण्यात आली होती. मात्र दोघांनाही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. त्यामुळे दोघांपॆकी कोणाला अंतिम ११ मध्ये स्थान मिळणार? ते पाहणं महत्वाचं असणार आहे.

भारतीय संघासाठी जमेची बाजू म्हणजे विराट कोहली, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल यांनी चांगली कामगिरी केली आहे. मात्र भारतीय कर्णधार रोहित शर्माला नेदरलँड्स संघाविरुद्ध संपूर्ण स्पर्धेत एकच अर्धशतक झळकावता आलं आहे. उद्याच्या सामन्यात रोहित शर्मा मोठी खेळी साकारून भारताला तिसरी अंतिम फेरी गाठून देणार का? यावर भारतीय चाहत्यांचे आवर्जून लक्ष असेल. या सामन्यात जोस बटलर, अलेक्स हेल्स, बेन स्ट्रोक्स, विराट कोहली, सूर्यकुमार यादव हे स्टार प्लेअर्स असतील.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com