शेवटी फलंदाजांचे फावले

शेवटी फलंदाजांचे फावले

डॉ. अरुण स्वादी

फलंदाजांना हवीहवीशी वाटावी, अशी खेळपट्टी आखाती देशात या मोसमात क्वचितच मिळाली, पण श्रीलंका-ऑस्ट्रेलिया सामन्यात Sri Lanka-Australia match दुबईची विकेट पाहून दोन्ही देशांचे फलंदाज हरखून गेले असतील. अर्थात कांगारुंनी त्याचा पुरेपूर फायदा उठवला असला तरी लंकेला ते जमले नाही. पहिल्या सत्रात विकेट किंचित, अगदी किंचित संथ होती आणि चेंडू वळत होता; तोही किंचित! दुसर्‍या सत्रात दव पडले आणि विकेट फ्लॅट झाली.

ऑस्ट्रेलियाने ही संधी साधून 154 धावांचे आव्हान 17 ओवरमध्ये संपवून रन रेट वाढवला. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करणारा संघ दुबईत पुन्हा जिंकला. त्यापूर्वी श्रीलंका चांगली सुरुवात करीत आहे, असे वाटत असताना डम झंपा गोलंदाजीसाठी आला आणि त्याने प्रथम फलंदाजांना वेसण घातली. मग विकेट घेतल्या. लंकेला मोकाट सुटू दिले नाही. जलद बॉलर्सनी त्याला छान मदत केली. स्टार्क, कमिन्स तर टी-20 गोलंदाज आहेतच, पण कसोटी गोलंदाज म्हणून शिक्का बसलेल्या हेजलवूडने आता अशा क्रिकेटमध्ये चांगले बस्तान बसवले आहे. ही सारी चेन्नई आणि धोनीची कृपा!

आपले स्पिनर काही चमत्कार करतील हे लंकेचे स्वप्न फिंच वॉर्नर जोडीने पॉवर प्लेमध्येच उधळून लावले. गेले काही महिने वॉर्नरला धावांचा दुष्काळ पडत होता. काल सुरुवातीला त्याची बॅट ‘छुपा-छुपी खेले आवो’ म्हणत होती. मग मात्र त्याने तडाखेबंद फलंदाजी केली. सामन्याचा नूर बदलून टाकला. स्टीव स्मिथ मात्र आपण टी-20 संघात बसू शकत नाही हे कसोशीने सिद्ध करीत होता. लंकेचा मुख्य प्रश्न त्यांची फलंदाजी आहे. कुसल परेरा फॉर्मात नाही.

कुशल मेंडिस व डिकवेला वर बंदी घातलेली, चंदिमल नावडता, त्यामुळे परिस्थिती गंभीर आहे. असलंका मात्र लंकेला तारतोय..तो तरुणपणीच्या अर्जुना रणतुंगासारखा खेळतो. अष्टपैलू हसरंगा पण आपले हुनर दाखवतोय. कधी बॅटिंगमध्ये तर कधी बॉलिंगमध्ये, पण एवढ्या तुटपुंज्या सामग्रीवर लंका उपांत्य फेरीत पोहोचेल हे संभवत नाही.

Related Stories

No stories found.