T20 World Cup 2021 Final Match : न्यूझीलंड की ऑस्ट्रेलिया कोण पटकावणार विश्वचषक?

T20 World Cup 2021 Final Match : न्यूझीलंड की ऑस्ट्रेलिया कोण पटकावणार विश्वचषक?

दुबई | Dubai

आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२१ चा (ICC T20 World Cup 2021) अंतिम सामना (Final Match) आज न्यूझीलंड (New Zealand) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) या दोन संघांमध्ये सायंकाळी ७:३० वाजता दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवण्यात येणार आहे...

सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया (AUS) आणि न्यूझीलंड (NZ) संघांमध्ये टी २० वर्ल्डकपच्या विजेतेपदासाठी घमासान पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. दोन्ही संघ फलंदाजी आणि गोलंदाजीत संतुलित असल्यामुळे सामना अधिक रोमांचक होईल यात काही शंका नाही.

२०१५ साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघांमध्ये ५० षटकांच्या विश्वचषक विजेतेपदासाठी सामना झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंड संघाला पराभवाची धूळ चारून सलग पाचवा विश्वचषक जिंकला होता.

या पराभवाची परतफेड करण्यासाठी न्यूझीलंड सज्ज आहे. आता तब्बल ६ वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर दोन्ही संघ टी २० वर्ल्डकपवर आपली विजयी मोहोर उमटवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.

साखळी सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघाची फलंदाजीतील कामगिरी कमकुवत दिसली होती. मात्र उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंड फलंदाज फॉर्मात परतले असल्याने ऑस्ट्रेलिया संघाची धाकधूक वाढली आहे.

संघाच्या गोलंदाजीवर नजर टाकल्यास ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, एडम मिल्ने या तेज गोलंदाजीच्या त्रिकुटासह फिरकीपटू ईश सोधी, आणि मिचेल सॅन्टेनर यांनी केलेल्या अचूक आणि भेदक माऱ्यामुळे न्यूझीलंड संघाच्या विजयात महत्वाची कामगिरी केली आहे.

आजच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाला एक धक्का बसला आहे. यष्टीरक्षक फलंदाज डेवीन कॉन्व्हे याला इंग्लंडविरूद्ध उपांत्य सामन्यात दुखापत झाली होती. त्याच्याजागी यष्टीरक्षणाची जवाबदारी ग्लेन फिलिप्स याच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलिया संघाबद्दल सांगायचे झाले तर, ऑस्ट्रेलिया संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी मजबूत आहे. संघात एरन फिंच, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मीथ आणि ग्लेन मॅक्सवेल असे सामन्याचे चित्र एकहाती फिरवू शकणारे फलंदाज आहेत.

गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स या अनुभवी त्रिकुटाला साथ देण्यासाठी ग्लेन मॅक्सवेल, एडम झाम्पा असे पर्याय आहेत. शिवाय दुबई येथे नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरेल. नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजीला प्राधान्य देईल यात काही शंका नाही.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com