कांटे की टक्कर!

कांटे की टक्कर!

डॉ. अरुण स्वादी

इंग्लंड आणि न्यूझीलंड... England and New Zealand ...क्रिकेटमधली जुळी भावंडे वाटावीत इतकीसारखी दिसतात. दोन्ही देशातले हवामान सारखे! स्विंगवर त्यांची मदार असते. आणि दोघांचा भर असतो ट्रॅडिशनल क्रिकेट खेळण्यावर, पण गेल्या काही वर्षात इंग्लंडने व्हाईट बॉल क्रिकेट खेळताना स्वतःचा कायापालट करून घेतला आहे. 2015 च्या विश्वचषक स्पर्धेत त्यांची पुरती नाचक्की झाली होती. कोणीही यावे आणि त्यांना बदडून काढावे, असे चालले होते. यातून त्यांनी धडा घेतला.

मुक्त आक्रमणाची दीक्षा घेतली. जराजर्जर झालेले त्यांचे मर्यादित षटकांचे क्रिकेट कात टाकून मुक्त झाले. 2019 चे ते चॅम्पियन झाले. आता सर्व क्रिकेट जगताने त्यांचा धसका घेतला आहे. न्यूझीलंड मात्र अजूनही पारंपरिक मर्यादित ओवरचे क्रिकेट खेळत आहे. मजा म्हणजे पॉवर पलेचा कसा फायदा घ्यायचा हे जगाला शिकवले मार्क ग्रेटबॅचने आणि संपूर्ण आक्रमणाचा मंत्र दिला मार्टिन क्रो या किवी कर्णधाराने! कर्णधार माकुलमने.हेच आखरी सच हे बिंबवले, पण विल्यमसनची टीम संपूर्ण आक्रमण न करता संतुलित आक्रमण करते. थोडक्यात भिन्न जातकुळीचे क्रिकेट खेळणारे संघ बुधवारी शड्डू ठोकून उभे ठाकणार आहेत.

इंग्लंड कागदावर तरी सरस वाटत होते, पण जेसन रॉय व कायले मिल्सला झालेल्या दुखापतीमुळे त्यांनी एक अफाट फलंदाज आणि स्लोअर वनचा स्पेशलिस्ट गमावला आहे. त्याचा परिणाम निश्चित अपेक्षित आहे. इंग्लंडची फलंदाजी सातत्याने फटाके फोडत असते, पण रॉयची अनुपस्थिती आणि बेअरस्टो व मॉर्गंनचा हरवलेला फॉर्म इंग्लंडसाठी काळजी वाटणारा आहे. उलट किवी फलंदाजी आपला आब राखून आहे. गोलंदाजीत वेगवान गोलंदाज मार्क वूड कमजोर कडी ठरू शकतो, पण आदिल रशीद जोरात आहे. या स्पर्धेतला तो सर्वोत्कृष्ट स्पिनर आहे. बोल्ट आणि सौदी हे किवी मुख्य गोलंदाज! मात्र भारताला हादरवूनही संतनर सोधी हे स्पिनर कमजोर वाटतात.

थोडक्यात दुखापतीने ग्रासलेल्या, पण बरेच मॅच विनर असलेल्या इंग्लंडपेक्षा सरासरी टी-20 क्रिकेट खेळणारा न्यूझीलंडचा फॉर्मातला संघ कागदावर तरी सरस वाटतोय. मात्र शेवटी कागदापेक्षा मैदान महत्त्वाचे!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com