नवे तंत्र, नवा मंत्र

नवे तंत्र, नवा मंत्र

डॉ. अरुण स्वादी

अफगाणिस्तानने Afghanistan काल नव्या रुपात, नव्या रंगात, नव्या जोशात आणि नव्या वेशात टी-20 क्रिकेट पेश केले. दुपारच्या सामन्यात धुव्वाधार फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असणारे एकाहून एक धुरंधर वेस्ट इंडिजचे West Indies खेळाडू बिचकत होते. धडपडत होते आणि त्याच दिवशी संध्याकाळी अफगाणिस्तानचा नवखा संघ पाकिस्तानसारख्या परिपूर्ण संघाशी त्यांच्याच आवेशाने झुंजत होता. ते पराभूत झाले म्हणून काही बिघडत नाही. त्यांनी भल्या-भल्या वरिष्ठ संघाना टी-20 क्रिकेट कसे खेळावे याचा धडा घालून दिला आहे.

नाणेफेक जिंकून त्यांनी प्रथम फलंदाजी घेतली. इथूनच त्यांनी वेगळ्या डावपेचांना सुरुवात केली. दुबईत दव पडते हे एव्हाना गल्लीतल्या पोरा-सोरांना माहीत झाले आहे. दुसरी फलंदाजी करणार्‍या संघाची जिंकायची शक्यता जास्त असते हे कोणाला माहीत नाही? तरीही अफगाण कर्णधाराने टॉस जिंकून फलंदाजी घेतली. या निर्णयामागचे गणित काय होते माहीत नाही, पण त्यांचे झाझाई आणि शाहबाझ दोघेही फटकेबाज खेळाडू काही काळात तंबूत परतले. मात्र अफगाण खेळाडूंनी आक्रमण सोडले नाही.

सातव्या विकेटसाठी कर्णधार मोहमद नबी आणि गुलबदिन यांची जोडी जमली. त्यांनी आकर्षक क्रिकेटचा नजराणा पेश केला. त्यांनी केलेले हुक व पुल किंवा अगदी कवर वा स्ट्रेट ड्राईव्ह डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. त्यांच्या प्रतिहल्ल्यापुढे कसलेला पाकिस्तानही बावरून गेला. हसन अली तर टप्पा विसरला. सामन्याची सूत्रे अफगाणिस्तानने आपल्या हातात घेतली ती पाकच्या अठराव्या ओवरपर्यंत! शेवटच्या दोन ओवरमध्ये पाकला जिंकायला 24 धावा हव्या होत्या. सामना नबीच्या संघाच्या खिशात होता, पण मसिक्स हिटरफ म्हणून पहचान असलेल्या आसिफ अलीने वीक लिंक असलेल्या करीम जन्नतवर षटकारी हल्ला चढवून सामना संपवून टाकला.

मात्र अफगाणी खेळाडू ज्या त्वेषाने पाकिस्तानला भिडले ते दृश्यच आगळे वेगळे होते. अफगाण फिरकी गोलंदाजांनी, मुजीब, नबी आणि राशिदने तर पाक फलंदाजांना बांधून ठेवले होते. बुमराह स्टाईलने तेज गोलंदाजी करणार्‍या नविद उल हकने पण त्यांना उसंत दिली नाही. असिफ अली आला आणि त्याने खेळ खल्लास केला. फिनीशर कसा असतो हे त्याने दाखवून दिले. नुसता भास मारून, काहीही साध्य होत नाही. 1996च्या पन्नास ओवरच्या विश्वकरंडक स्पर्धेत लंकेच्या जयसूर्या कालूवितरना जोडीने पॉवर प्लेमध्ये हाणामारी करायचा नवा फॉर्म्युला शोधला होता.

असेच काहीसे नबीच्या टीमचे धोरण होते. विकेट पडल्या तर पडल्या, पण खेळ धिमा करायचा नाही, छक्के मारायचा प्रयत्न करायचाच हे त्यांच्या खेळाचे सूत्र होते. ठीक आहे काही सामने ते हरतील, पण हे नवे तंत्र आणि मंत्र खेळ रोमांचकारी बनवेल. एरवीही टी-20 त आजकाल सुरक्षित आक्रमण केले जाते. पॉवर प्लेमध्ये हाणामारी करायची. मग अगदी पंधराव्या ओवरपर्यत सांभाळून खेळायचे आणि मग दणादण! अफगाणिस्तानने टी-20 मध्ये टी 10 सारखे खेळायचा मंत्र दिला आहे म्हणा ना!

Related Stories

No stories found.