बैल गेला, झोपा केला...

बैल गेला, झोपा केला...

डॉ. अरुण स्वादी

पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून जमके धुलाई झाल्यावर भारताला वास्तवाची जाणीव झाली. आता खेळलो नाही तर आपले काही खरे नाही, याची कल्पना त्यांना आली. यामुळे आम्ही फियरलेस क्रिकेट खेळणार, अशी घोषणा त्यांनी केली आणि त्याप्रमाणे ते खेळलेदेखील! त्याचा परिणाम लगेच दिसला.

अफगाणिस्तानविरुद्ध त्यांनी प्रथम 20 ओव्हरमध्ये 210 धावा ठोकल्या आणि 146 धावांत त्यांना रोखून गिनके 66 धावांनी मोठा पराभव केला. आता हे सगळे ‘अब पछता ये होत क्या, जब चिडिया चुग गयी खेत’ स्टाईलने झाले खरे, पण त्यामुळे दाट अंधारात कुठेतरी प्रकाशाचा एखादा किरण तरी दिसतोय.

लागोपाठ दोन सामने हरल्यावर रोहित शर्मावर सडकून टीका होत होती. त्याने यावेळी ‘इट का जवाब पत्थरसे’ दिला. राहुलने तोडीस तोड फटकेबाजी केली. इथेच सामना कोण जिंकणार हे निश्चित झाले.

हार्दिक पांड्या पूर्ण भरात नाही, पण त्याने भरपूर धुलाई केली. पंतने हात साफ करून घेतले. ही खेळपट्टी दुबईपेक्षा ठीक होती, पण दुबईची खेळपट्टी भारताने शेपूट घालावी इतकी वाईटही नव्हती. त्यावेळी आपण बिचकून खेळलो. आपल्याला पराभवाची भीती होती. त्या दडपणाखाली आपण खेळलो आणि सामना गमावून बसलो.

एवढे मोठे आव्हान नाबीच्या संघाला पेलणे शक्य नव्हते. त्यातच जवळ-जवळ चार वर्षांनी भारताकडून टी-20 खेळणार्‍या आश्विनने आपले सारे कौशल्य पणाला लावून सुरेख गोलंदाजी केली. डावाच्या मध्यात आपल्याला विकेट मिळत नव्हत्या. आश्विनने ती उणीव भरून काढली, पण अफगाण फलंदाज ठीक विकेटवर 150-160 धावांची मजल मारू शकतात. म्हणूनच न्यूझीलंडविरुद्ध त्यांना जिंकायची चांगली संधी आहे, असे मला वाटते.

सारा भारत हा सामना जीवाच्या कराराने पाहणार यात शंका नाही. स्कॉटलंडविरुद्ध किविजना सहज जिंकता आले नाही. बलाढ्य पाकला अफगाणिस्तानने शेवटपर्यंत झुंज दिली हे त्रैराशिक एकच सांगते, भारताला अजून उपांत्य फेरीची आशा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com