कांगारू फस्त

कांगारू फस्त

डॉ. अरुण स्वादी

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना आयोजकांसाठी पर्वणी असेलही, पण इंग्लंड-ऑस्ट्रेलिया England-Australia यांच्यातील सामनेही तेवढेच क्राउड पुलर असतात. त्यांनाही प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा असतो. मात्र टी-20 विश्वचषक स्पर्धेतला या दोघांमधील सामना एकदम मिळमिळीत निघाला. कोणताही मसाला नसलेला हा रस्सा सर्वांना बेचव वाटला.

इंग्लंडने नाणेफेक जिंकली. प्रथेप्रमाणे फिल्डींग घेतली. पहिल्या काही ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचा निकाल लागला. चेंडू भलताच स्विंग करीत होता हे खरे! हे वोक्स, जॉर्डनचे कौशल्य की, पिचची मेहेरबानी? माहीत नाही, पण या दोघांनी कांगारू फलंदाजांना एकही बत्तासा फोडायला दिला नाही. उलट वॉर्नरने स्टेपअप होऊन खेळण्याच्या नादात सोपा झेल दिला. स्मिथने तर त्याहून वाईट फटका मारला.

मॅक्सवेल पॉवर प्लेतला तिसरा बळी ठरला. 3 बाद 15... आणि स्टॉइनीस पॉवर प्लेच्या पुढच्याच चेंडूवर बाद झाला. 4 बाद 21...! त्यानंतरही ऑस्ट्रेलिया सव्वाशेपर्यंत पोहोचला ही कर्णधार फिंच, वेड आणि अगारची कृपा! इंग्लंडचा मुख्य स्पिनर आदिल रशीद सुरेख गोलंदाजी करतो आहे, पण लिव्हिंगस्टन हा मूळचा फलंदाज रशीदसारखा लेग ब्रेक गुगली टाकत त्याला छान साथ देत आहे. त्यातल्या त्यात मिल्सला जरा धोपटताहेत एवढेच! एरव्ही इंग्रजांनी आखाती देशातल्या वातावरणाशी जमवून घेतल्याचे दिसतेय.

सव्वाशे धावा काढताना काहीतरी चमत्कार होईल, ही शक्यता स्टार्क आणि हेजलवूड यांच्या पहिल्या काही षटकांत निकालात निघाली. रॉय व बटलरने जोरदार फोडाफोडी केली. बटलरने साहेबी खाक्यात 32 चेंडूत 71 धावा चोपल्या. काही कळायच्या आत सामना इंग्लंडने फस्त केला.

मजा म्हणजे दुसर्‍या सत्रात ना चेंडू स्विंग झाला ना स्पिन! काय जादू झाली कोणास ठाऊक? इंग्लंडने हा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केल्यासारखा आहे. त्यांची डोकेदुखी एकच... कर्णधार मॉर्गनच्या धावा होत नाहीत. त्याला संधीही मिळत नाही. कारण त्याच्या आधीचे फलंदाज सामना संपवत आहेत. शिवाय अजून तरी इंग्लंडच्या वाट्याला चुरशीचा सामना आलेला नाही. थोडक्यात, पाय पसरून, आरामात बसून ढेकर देत ते प्रतिस्पर्ध्यांना फस्त करीत आहेत. कांगारूंना मात्र नक्की काय करावे याचे विचार मंथन करावे लागेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com