सावळागोंधळ!

सावळागोंधळ!

डॉ. अरुण स्वादी

शिमगा केंव्हाच संपला, पण कवित्व काही दिवस चालूच राहणार, अशी लक्षणे दिसत आहेत. न्यूझीलंड विरुद्ध फलंदाजीची क्रमवारी का बदलली? यावर सन्माननीय सुनील गावस्कर Sunil Gavaskar सरांपासून अनेक माजी क्रिकेटवीरांपर्यंत सर्वांनी आपली मते जाहीरपणे मांडली आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या क्रिकेट रसिकाचा पार गोंधळ उडाला आहे. रोहित शर्माला Rohit Sharma सलामीला न पाठवता क्रमांक तीनवर का पाठवले? असा तक्रारीचा सूर बर्‍याच जणांनी काढला आहे.

टी-20 मध्ये आघाडीवर येऊन चार शतके ठोकणार्‍या फलंदाजाचे असे डिमोशन का? हा प्रश्न योग्यच आहे, पण यावर बरेच स्पष्टीकरण देता येऊ शकते. निव्वळ डाव्या उजव्यासाठी नव्हे तर आक्रमक खेळावे म्हणून ईशान किशन संघात आला, पण आघाडीला का? तर चौथ्या पाचव्या क्रमांकावर खेळताना सगळीकडे त्याची पुरी वाट लागली होती. तो पार गोंधळला होता. त्यामुळे त्याला संघात घ्यायचे तर सलामीला खेळवणे भाग होते. प्रश्न आला त्याला साथ कोण देणार? रोहित की राहुल? इतिहास रोहितच्या बाजूने होता आणि वर्तमान राहुलच्या! गेल्या वर्षात रोहित टी-20 खेळला कमी आणि आयपीएलमध्ये तर त्याला फारशा धावा करता आल्या नाहीत.

उलट राहुलने अक्षरशः खोर्‍याने धावा काढल्या आणि त्याही जबरदस्त खेळत! म्हणजे वर्तमान त्याच्या बाजूने होते. गंमत म्हणजे चौथ्या किंवा पाचव्या नंबरवर ना रोहित, ना राहुल यशस्वी झाले. त्यातल्या त्यात राहुलने बरी कामगिरी केली. या घोळात स्वतः विराट कोहलीने आपला हक्काचा तिसरा क्रमांक सोडला; जिथे तो नेहमी यशस्वी ठरला आहे. तो आला चौथा क्रमांकावर; जिथे तो बहुतांशी अयशस्वी झाला आहे.

एवढा सावळा गोंधळ घालून मिळवले काय? ईशान हजेरी लावून परतला. राहुलने तेच केले. एक जीवदान मिळूनही रोहितने ईश सोधींला ‘जा, ऐश कर ले’ म्हणत आपली विकेट गिफ्ट केली. या सगळ्याचा वीट आल्यासारखा विराटने एक बेजबाबदार फटका मारत आपली विकेट फेकली. म्हणजे ‘तेलही गेले, तूपही गेले, हाती धुपाटणे आले’!

मात्र रोहितला ट्रेंट बोल्टला तोंड देता येणार नाही म्हणून तीनवर पाठवायचे ठरले असेल तर ते मात्र चुकीचे नव्हे तर आक्षेपार्ह आहे. यामुळे कोणाही फलंदाजांचा आत्मविश्वास डळमळीत होईल. रोहितचे डावर्‍या सिमर्स विरुद्धचे रेकॉर्ड बरे नसेलही, पण कोणा भारतीयाचे ते चांगले आहे ते तरी कळू द्या. अगदी ज्या गावस्कर साहेबांनी ही ‘अंदरकी बात’ सांगितली तेही सांगतील त्या व्हॅसलीनवाल्या डावर्‍या जॉन लिवरने आपली कशी त्रेधा तिरपीट उडवली होती ते! कधी वासिम अक्रम तर कधी मोहमद आमीर तर कधी नाव न ऐकलेला बेहरेंड्रोफ यांनी आपल्याला कचकचा चाऊन खाल्ला आहे.

त्या साम करनने काय कमी त्रास दिलाय? तसेही उजव्या फलंदाजाला डावखुरा गोलंदाज त्याच्या अँगलमुळे त्रास देतोच..रोहितला खाली पाठवायचे हे कारण असेल तर मी म्हणेन, हा निर्णय शुद्धीत असताना घेतलेला नाही. अगदी असाच घोळ आदरणीय ग्रेग चॅपेल सरांनी घेतला होता. सचिनला चार नंबरवर पाठवायचा निर्णय त्यांचाच! सचिन मनाविरुद्ध खेळला. अयशस्वी झाला. पुढे काय झाले? 2007 मधल्या विश्वकप स्पर्धेत आम्ही पहिल्या फेरीत हरलो. त्यामुळे प्रचंड नाचक्की झाली. यावेळी रोहित शर्माचा बकरा बनवून इतिहासाची पुनरावृत्ती करायचा विचार तर नाही ना? आमच्या ब्रेन ट्रस्टला योग्य बुद्धी मिळो हीच प्रार्थना!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com