... वेळ आली नव्हती!

... वेळ आली नव्हती!

डॉ. अरुण स्वादी

नाणेफेक हरून, पहिली फलंदाजी करून, मग दवात भिजलेल्या चेंडूने गोलंदाजी करत चांगल्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करायची किमया करून इंग्लंडने England बाद फेरीसाठी छान मॅच प्रॅक्टिस केली. अर्थात, हे काही त्यांना आरामात करता आले नाही.

श्रीलंकेने Shrilanka त्यांच्या नाकात दम आणला होता. पॉवर प्लेमध्ये तीन बळी घेऊन इंग्लंडला अडचणीत आणले होते. चेंडू भलताच स्पिन होत होता. हसरंगा रंगात आला होता, पण बटलर आणि मॉर्गनने ही कठीण परिस्थिती राम भरोसे का असेना ती हाताळली. टिकू-टिकू खेळत धावा जोडल्या. शेवटच्या चार षटकांत चारो ओर पिटाई केली. अवघड विकेटवर शतक ठोकणे ही बटलरची मोठीच कामगिरी होती.

काही अभ्यासक्रमातले तर काही त्याबाहेरचे फटके मारत जोसने आपला दर्जा दाखवून दिला. खूप दिवसांनी मॉर्गनच्या बॅटला चेंडूचा स्पर्श झाला. मैदानावर पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ टिकायची मोठी कामगिरी त्याने यावेळी केली. तो मोठा फलंदाज आहे, पण त्याचा बॅडपॅचदेखील तेवढाच मोठा होता. इतके दिवस तो नॉन प्लेयिंग कॅप्टन होता. यावेळी त्याला फॉर्म गवसतो आहे, अशी चिन्हे दिसत होती. 4 बाद 163 ही सन्माननीय धावसंख्या त्यामुळे त्यांना उभारता आली.

लंकेने मागच्या मॅचचा हिरो पथुन निसानाला पहिल्याच चेंडूवर गमावल्यावर असलांका आला. त्याने खेळपट्टीत काहीही दम नसल्याचे आपल्या फटकेबाजीतून सिद्ध केले. हसरंगा आणि कर्णधार शनाकाने तुफानी फटके मारत सामना आपल्या संघाच्या बाजूने पुरता फिरवला होता. हसरंगा हे पाचूच्या बेटात सापडलेले नवे रत्न आहे. तो बाद झाला तो एका अफलातून झेलामुळे. हा झेल जेसन रॉय आणि बिलिंग यांचे जॉईंट व्हेंचर होते. पुढच्याच चेंडूवर कर्णधार शनाकाने धावबाद होऊन आत्महत्या केली. नंतर फक्त सोपस्कार उरले होते. 5/129 वरून हा सामना इंग्लंडने ओढून काढला.

अर्थात, पराभूत होऊनही श्रीलंकेने नाव कमावले. अगदी सहा महिन्यांपूर्वी हा संघ कुपोषणग्रस्त झाला होता. भारताने आपला ‘ब’ संघ जो सध्याच्या ‘अ’ संघापेक्षा चांगला आहे त्याला पाठवून त्यांना धीर दिला. त्यांना विजयाचे टॉनिक प्यायला दिले. आता हा संघ बाळसे धरू लागला आहे. स्पर्धेतून बाहेर पडताना श्रीलंकेला हे समाधान निश्चित लाभेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com