
मुंबई | Mumbai
कलिंगा मैदानावर आज शुक्रवारपासून पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी यजमान भारतीय संघ वर्ल्डकप स्पर्धेतील आपला सलामी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
भारतीय हॉकी संघाचा सलामी सामना आज स्पेनशी होणार आहे. या स्पर्धेत एकूण १६ संघांनी विजेतेपदासाठी आपला सहभाग नोंदवला आहे. गत ऑलिम्पिक स्पर्धेतील दमदार कामगिरीमुळे यजमान भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे.
गतवर्षी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करून इतिहास रचणारा भारतीय हॉकी संघ आता हॉकी विश्वचषक स्पर्धेतील पदकांचा दुष्काळ संपवण्यासाठी मैदानात उतणार आहे. भारतीय संघाला दुसऱ्यांदा यजमानपद भूषवण्याचा बहुमान मिळाला आहे.
१९७१ च्या पहिल्या हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने कांस्यपदक पटकावले होते. १९७३ मध्ये रौप्य पदकाची भारताने कमाई केली होती. १९७५ मध्ये भारताने विश्वविजेतेपदाचा बहुमान पटकावला होता. १९७८-२०१८ या कालावधीत भारताला वर्ल्डकप स्पर्धेत साखळी फेरीचा टप्पाही गाठण्यात अपयश आले होते.
जागतिक क्रमवारीत भारतीय संघ सहाव्या स्थानावर आहे. हरामनप्रीतकडे भारतीय संघाचं कर्णधारपद असणार आहे. सायंकाळी ७ वाजता स्टार स्पोर्ट्स २ वर सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.