आज गुजरात - राजस्थान पहिला क्वालिफायर सामना; कुणाला मिळणार फायनलचे तिकीट ?

आज गुजरात - राजस्थान पहिला क्वालिफायर सामना; कुणाला मिळणार फायनलचे तिकीट ?

मुंबई । Mumbai

हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळणारा गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आपल्या पदार्पणाच्या हंगामात अंतिम सामन्याचे तिकिट पक्के करण्यासाठी कोलकाताच्या ईडन गार्डन्स क्रिकेट स्टेडियमवर (Eden Gardens Cricket Stadium) राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) संघाविरुद्ध दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे...

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (GT VS RR) संघांमध्ये आज पहिला क्वालिफायर सामना (Qualifier match) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात विजय मिळवून थाटात अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी दोन्ही संघांनी कंबर कसली आहे .

आयपीएल २०२२ ( IPL 2022) च्या गुणतालिकेत दोन्ही संघांनी अव्वल २ स्थानांमध्ये आपले स्थान निश्चित केले असल्यामुळे दोन्ही संघांना अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करण्याची दुसरी संधी मिळणार आहे. पराभूत संघाचा सामना एलिमिनेटर (Eliminator) लढतीतील विजेता संघाशी शुक्रवारी अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर (Narendra Modi Cricket Stadium) होणार आहे.

आजच्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाचे फिनिशर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघाचे अनुभवी स्पिनर्स असा सामना आज रंगणार आहे. गुजरात आणि राजस्थान संघांकडे घातक गोलंदाजी आक्रमण आहे. तसेच अनेक उत्तम फिनिशर्स आहेत. त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होण्याची अधिक शक्यता आहे.

आयपीएल २०२२ मध्ये पहिल्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्स संघाने राजस्थान रॉयल्स संघाला पराभवाची धूळ चारली होती. या पराभवाची सर्रास परतफेड करण्यासाठी राजस्थान आजच्या सामन्यात रॉयल विजय संपादन करण्यासाठी आज कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर उतरणार आहे.

दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघामध्ये पर्पल कॅप होल्डर युझवेन्द्र चहल (Yuzvendra Chahal) आणि आर अश्विन (R. Ashwin) यांच्यासारखे अनुभवी फिरकीपटू आहेत. तर दुखापतीतून सावरून आयपीएल २०२२ मध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि सलामीवीर शुभमन गिलकडून (Shubhaman Gill) गुजरात टायटन्स संघाला मोठी खेळी अपेक्षित असणार आहे. या दोन्ही खेळाडूंनी यंदाच्या संपूर्ण हंगामात ४०० पेक्षा अधिक धावा काढल्या आहेत.

दरम्यान, आजच्या सामन्यात जोस बटलर, हार्दिक पंड्या, शुभमन गिल, संजू सॅमसन, ट्रेंट बोल्ट हे स्टार प्लेअर्स असतील. तसेच आजच्या सामन्यात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

सलिल परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com