राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकचा सुवर्ण चौकार

राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकचा सुवर्ण चौकार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुंबई (Mumbai) येथे सुरु असलेल्या टीएसटीटीए (TSTTA) आयोजित डॉ. रमेश प्रभु मेमोरीयल राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत (Dr. Ramesh Prabhu Memorial State Rankings Table Tennis Competition) नाशिकच्या सायली वाणी (Sayali Vani) आणि तनीषा कोटेचा (Tanisha Kotecha) यांनी अनुक्रमे १९ व १७ वर्षाखालील मुलींच्या गटाचे विजेतेपद मिळवून पुन्हा एकदा आपले प्रभुत्व सिद्ध केले व सुवर्ण पदक (Gold Medal) मिळविले...

२१ वर्षाखालील मुलींच्या गटात शुभा भट (Shubha Bhat) आणि महिला एकेरीमध्ये श्रेया देशपांडे (Shreya Deshpande) यांनी सुवर्णपदक मिळविले आहे. या स्पर्धेत नाशिकचा सुवर्ण चौकार लागला आहे. या स्पर्धा प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विलेपार्ले, मुंबई येथे सुरु आहेत.

नाशिकच्या दुसऱ्या मानांकित सायली वाणीने अंतिम फेरीत नागपूरच्या जेनिफर वर्गीसचा ११-१,११-१०, १५-१३, १२-१० असा ४-० असा सहजरीत्या पराभव करुन विजेतेपद मिळविले. सायलीने उपांत्यपूर्व फेरीत ठाण्याच्या सातवी मानांकित श्रावणी सावंत ४-२ तर उपांत्य फेरीत पुण्याच्या तिसऱ्या मानांकित पृथा वर्टीकर हीचा ४-२ असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात नागपूरची आठवी मानांकित जेनिफर वर्गीस हीने अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत टीएसटीटीए मुंबईच्या दुसऱ्या मानांकित विधी शहाचा ४-३ ने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. परंतु जेनिफेरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

१७ वर्षाखालील मुलींच्या गटात दुसरी मानांकित तनिषा कोटेचा अंतिम फेरीत ठाणाच्या चौथ्या मानांकित श्रावणी सावंत ११-६,११-४, ७-११, ११-६ १४-१२ असा ४-१ ने पराभव करून अजिंक्यपद पटकावले.

तनीषाने उपांत्यपूर्व फेरीत टीएसटीटीए मुंबईच्या हार्दि पटेलचा ४-० ने पराभव केला तर उपांत्य फेरीत ठाण्याच्या ११ वी मानांकित शुभा भट हीचा ४-१ ने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात नाशिकच्या प्रथम मानांकित सायली वाणीचा अत्यंत अटीतटीच्या लढतीत ४-२ ने ठाण्याच्या चौथ्या मानांकित श्रावणी सावंतने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. परंतु अंतिम फेरीत तिला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.

२१ वर्षाखालील बिगर मानांकित ठाण्याच्या शुभा भट हीने टीएसटीटीए मुंबईच्या अनन्या चांदेचा अत्यंत चुरशीच्या सामन्यात ४-११, ४-११, ११-७, ८-११,१३-११, ११-८, १३-११ असा ४-३ ने पराभव करून सुवर्ण पदक पटकावले.

महिला एकेरीच्या सामन्यात ठाण्याच्या पंधराव्या मानांकित श्रेया देशपांडे हीने टीएसटीटीएच्या पहिल्या मानांकित विधी शहाचा ८-११,१५-१३,११-७,५-११, ११-४, ११-६ असा ४-२ ने पराभव करून विजेतेपद मिळवून सुवर्णपदक पटकावले.

विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ राज्य संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र छाजेड, अर्जून पुरस्कार विजेते कब्बडीपटू राजेश भावसार, आंतरराष्ट्रीय कब्बडीपटू गणेश शेट्टी, पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन मुंबईचे सदस्य बंसीधर धुरंधर, महाराष्ट्र कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष धनंजय साठे, राजेश भरवीरकर, संजय कडू यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी प्रभोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, मुंबई व टीएसटीटीए अध्यक्ष अरविंद प्रभु, योगेश देसाई, समीर भाटे, सुहास दांडेकर आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com