
आनंद खरे, क्रीडा समीक्षक
22 वी फिफा विशवचषक स्पर्धा( FIFA World Cup-2022) ही धक्कादायक निकालांनी गाजत आहे. या स्पर्धेत अगदी साखळी सामान्यांपासून ते राऊंड ऑफ 16 मध्ये आणि उपउपांत्य सामने या तीनही टप्यात हे चित्र दिसून आले आहे. जर्मनी आणि बेल्जीयमला साखळीमध्येच आपला गाशा गुंडाळावा लागला होता. तर मेस्सीला आणि अर्जेंटिनाला पहिल्याच सामन्यात सौदी अरबने धक्का देऊन पहिला उलटफेर घडवला होता.
परंतु त्यानंतर मेस्सीने आणि त्याचे सहकारी यांनी हा धक्का पचवत पुढे योग्य दिशेने वाटचाल केली आहे. गेल्या 2018 च्या विश्वचषकाचा विजेता फ्रान्स आणि प्रथमच पहिल्या चारमध्ये दाखल झालेल्या आफ्रिकन मोरोक्को संघ यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या दुसर्या उपांत्य सामन्यात अनेक कयास लावले जात होते. कारण या विश्वचषकामध्ये बर्याच सामन्यांचे निकाल हे अपेक्षेपेक्षा वेगळे लागले आहेत.
मोरोक्कोचा पूर्व इतिहास बघता या संघाने केवळ सहा वेळा विश्वचषक स्पर्धेत सहभाग मिळविले आहे. याआधीच्या पाच विश्वचषकमध्ये मोरोक्कोला केवळ 1986 च्या एकाच विश्वचषकामध्ये पहिल्या 16 मध्ये मजल मारता अली होती. तर इतर चार विश्वचषकामध्ये मोरोक्कोला साखळीमध्येच अडकून बसावे लागले होते. मात्र या कातारच्या 2022च्या विश्वचषकामध्ये मोरोक्कोने चमत्कार घडवला आहे. साखळीमध्ये मोरोक्कोने क्रमवारीमध्ये दुसर्या क्रमांकावर असलेल्या बलाढ्य बेल्जीयमला चक्क पराभूत केले त्यानंतर क्रोएशियाला बरोबरीत रोखले होते.
या कामगिरीच्या आधारे मोरोक्कोने आपल्या गटातून पहिल्या क्रमांकाने बाद फेरीत प्रवेश मिळविला होता. त्यानंतरच्या बाद फेरीच्या सामन्यातही मोरोक्कोने कमाल केली. राऊंड ऑफ 16 च्या सामन्यत मोरोक्कोने स्पेनला पेनल्टी शूट आऊट मध्ये घरचा रास्ता दाखवला. त्यानंतर उपउपांत्य सामन्यात बलाढ्य रोनाल्डोच्या पोर्तुगालवर गोल करून त्यांचाही स्वप्नभंग केला. मोरोक्कोच्या या अफलातून कामगिरीमुळे आजच्या या उपांत्य सामन्यात मोरोक्को पुन्हा असाच चमत्कार घडवतो का याचीच चर्चा सुरु होती. परंतु गेल्या विश्वचषक विजेत्या फ्रान्सचे प्रशिक्षक डिडियर डिस्चाम्प यांच्या अनुभवापुढे आणि कैलॅन ऍम्बॅपे आणि ऑलिव्हर ग्रॉऊंडच्या अफलातून खेळामुळे मोरोक्कोचा प्रवास येथेच थांबला.
या कतारच्या विश्वचषकाचे केवळ दोनच सामने बाकी आहेत. यामध्ये उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या मोरोक्को आणि क्रोएशिया यांच्यात होणार्या तिसर्या क्रमांकाचं सामन्याकडे फुटबॉल प्रेमींची नजर असणार नाही. मात्र दोन वेळचे विश्वविजेते फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात खेळल्या जाणार्या या सामन्यात कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे हे नक्कीच.