
आनंद खरे, क्रीडा समीक्षक
22 वी फिफा विश्वचषक स्पर्धा ( FIFA World Cup-2022 ) ही धक्कादायक निकालांनी गाजत आहे. या स्पर्धेत अगदी साखळी सामन्यांपासून ते राऊंड ऑफ 16 मध्ये आणि उपउपांत्य सामने या तीनही टप्यात हे चित्र दिसून आले आहे. आता प्रतीक्षा आहे ती दोन उपांत्य सामन्यांची. आज दोन वेळचा विश्वचषक विजेता अर्जेंटिना आणि मागील 2018 चा उपविजेता क्रोएशिया यांच्यात हे युद्ध पेटणार आहे.
मेस्सी संधी साधणार
फुटबॉल म्हटले की अर्जेंटिना आणि मेस्सीची चर्चा सुरु होते. फुटबॉलचा तारा लियोनेल मेस्सीने फुटबॉलच्या क्षेत्रातील सर्व पुरस्कार मिळविले आहेत. युरो कपही उंचावला आहे. परंतु पाच विश्वचषक खेळणार्या मेस्सीला फिफाचा हा सर्वात मानाचा विश्वचषक उंचावण्यात अपयश आले आहे. मेस्सीचा हा शेवटचा विश्वचषक आहे. त्यामुळे मेस्सी ही शेवटची संधी साधतो का की रशियामधील 2018 च्या विश्वचषक स्पर्धेचा उपविजेता अर्जेंटिनाला पुन्हा धक्का देतो याची प्रतीक्षा सर्वांना लागलेली आहे. कारण 2018 च्या विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिना आणि क्रोएशिया हे दोन संघ एकाच गटात होते.
या गटवार साखळीमध्ये क्रोएशियाने अर्जेंटिनाला 3-0 अशा फरकाने पराभूत केले होते. या पराभवामुळे अर्जेंटिनाला गटातून दुसर्या क्रमांकाने पहिल्या सोळा संघामध्ये प्रवेश मिळाला होता. या गटातील दुसर्या क्रमांकनेच अर्जेंटिनाचे सर्व गणितेच बिघडवून ठेवले होते. कारण राऊंड ऑफ 16 मध्ये अर्जेंटिनाला फ्रान्सशी खेळावे लागले. या सामन्यात अर्जेंटनाला पराभव पत्करावा लागला होता. आणि विजेत्यांचे स्वप्न अधुरेच राहिले होते. 2018 च्या विश्वचषकामध्ये क्रोएशियाने साखळी सामन्यांपासून जिद्दीने खेळ करून उलटफेर केले होते. त्यांनी राऊंड ऑफ 16 मध्ये डेन्मार्कला पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभूत केले. तर उपउपांत्य सामन्यात यजमान रशियाला 2-2 बरोबरीनंतर पेनल्टी शूट आऊटमध्येच पराभूत केले. तर उपांत्य सामन्यातही 1-1 बरोबरीमुळे 90 मिनिटानंतरच्या अतिरिक्त वेळेत गोल करून अंतिम फेरी गाठली होती.
क्रोएशियाचा या विश्वचषकात प्रवासही अगदी असाच झाला आहे. गटात क्रोएशियाने बेल्जीयमला बरोबरीत रोखून दुसर्या क्रमांकाने बाद फेरी गाठली होती. तर राउंड ऑफ 16 मध्ये चिकाटीने खेळणार्या जपानला 1-1 बरोबरीनंतर पेनल्टी शूट आऊटमध्ये बाहेर केले. त्यानंतर तर क्रोएशियाने कमालच केली. उपउपांत्य फेरीच्या सामन्यात ऑल टाईम फेव्हरेट ब्राझीलला निर्धारित वेळेत गोल करण्यापासून अडवले. आणि अतिरिक्त वेळेत ब्राझीलचा स्टार नेमारने गोल केल्यानंतर पिछाडीवर असतांनाही आपली जिद्द न सोडता तीन मिनिटे आधी गोल करून 1-1 बरोबरी साधली. त्यानंतर पुन्हा पेनल्टीमध्ये गेलेल्या या सामन्यात बलाढ्य ब्राझीलला 4-2 असे पराभूत करून लागोपाठ दुसर्या विश्वचषकामध्ये पहिल्या चार संघामध्ये आपले स्थान पक्के केले आहे.
या दोन्हीही विश्वचषक मध्ये क्रोएशियाचा हिरो लुका मॉड्रिकने आपल्या सर्व पेनल्टीचे गोल मध्ये रूपांतर केले आहे. आता या उपांत्य सामन्यात अर्जेंटिनाच्या मेस्सीची जादू चालते की लुका मॉड्रिकच्या संघाकडून पुन्हा 2018 च्या विश्वचषकाची पुनरावृत्ती होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.