फुटबॉलचा थरार : इंग्लंड-फ्रान्स लढतीकडे सर्वांचे लक्ष

फुटबॉलचा थरार : इंग्लंड-फ्रान्स लढतीकडे सर्वांचे लक्ष

आनंद खरे, क्रीडा समीक्षक

22व्या फिफा विश्वचषक ( FIFA World Cup 2022)स्पर्धेतील साखळी सामन्यांमध्ये चांगलेच उलटफेर बघायला मिळाल्यानंतर राऊंड ऑफ 16 मध्ये काही चमत्कार दिसून येतात का याची सर्वांना उत्सुकता होती. त्यानंतरच्या राऊंड ऑफ 16 च्या आठ सामन्यांत मोरोक्कोचा उलटफेर वगळता नेदरलँड, इंग्लंड, अर्जेंटिना, फ्रान्स, ब्राझील आणि पोर्तुगाल या दिग्गज संघांनी आपल्या खेळामध्ये सातत्य राखत विजय मिळवत बाद फेरीचा पहिला अडथळा दूर केला आहे.

मात्र आपल्या राऊंड ऑफ 16 च्या सामन्यात क्रोएशियाला जपानविरुद्ध पेनल्टीने साथ दिली. कारण जपानने आपल्या गटात जर्मनी आणि स्पेन या दोन विश्वविजेत्यांना पराभवाचा धक्का देत पहिल्या क्रमांकाने बाद फेरीत प्रवेश केला होता. जपानची ही कामगिरी बघता क्रोएशियावरही अशी वेळ येते की काय अशी स्थिती होती. कारण या सामन्यात जपानने पहिला गोल करून चांगली सुरुवात केली होती.

परंतु क्रोएशियाच्या पेरिसिकने गोल करून 1-1 बरोबरी साधल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आणि या बरोबरीनंतर शेवटी पेनल्टीमध्ये गेलेल्या या सामन्यात क्रोएशियाकडून गोली डोमिनिक लिवकोव्हिकने तीन गोल अडवून मोलाची कामगिरी केली, तर क्रोएशियाच्या व्लासीच, ब्रॉझोव्हि आणि पासॉली यांनी शांत डोक्याने पेनल्टी किक मारून जपानच्या गोलीला चकवले आणि क्रोएशियाने सुटकेचा नि:श्वास टाकला. आता चारसाठी होणार्‍या आजच्या रात्री पहिल्या दोन लढतीत अर्जेंटिनाचा मेस्सी आणि नेदरलँडचे कॉडी गॅकपो, मेम्फिस डेपै आणि नेमारचा ब्राझील आणि लुका मॉड्रिकचा क्रोएशिया यांच्यातील युद्ध संपलेले असेल.

इंग्लंड-फ्रान्स हाय होल्टेज ड्रामा - उपउपांत्य फेरीतील इंग्लंड-फ्रान्स यांच्यात होणार्‍या या तिसर्‍या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कारण या तुल्यबळ संघामध्ये कोण बाजी मारतो यावर अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत. या दोन संघांमध्ये याआधी खेळल्या गेलेल्या 31 सामन्यांमध्ये इंग्लंडने 17 विजय मिळवले आहेत तर फ्रान्सच्या नावावर केवळ पाच विजय आहेत, तर नऊ सामने अनिर्णीत राहिले आहेत. या आकडेवारीचा विचार करता इंग्लंडचे पारडे थोडेसे जड वाटत असले तरीही फ्रान्सची गेल्या चार-पाच वर्षांची कामगिरी लक्षात घेता फ्रान्सलाही झुकते माप द्यावे लागेल. अंतिम लढतीत क्रोएशियाला 4-2 असे पराभूत करून दुसर्‍यांदा विश्वचषक उंचावला होता. या विश्वचषकाच्या गोलच्या सरासरीमध्ये मेम्बापे केवळ चार सामन्यांमध्येच पाच गोल करून सर्वांच्या पुढे आहे. इंग्लंडचा विचार केल्यास इंग्लंडने नुकत्याच झालेल्या युरो कप स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले आहे.

पोर्तुगाल-मोरोक्को चमत्कार की सहज विजय - या विश्वचषकमध्ये मोरोक्को या एकमेव आफ्रिकन संघाने पहिल्या आठमध्ये प्रवेश मिळवला आहे. अर्थात, मोरोक्कोचा प्रवास सोपा नव्हता. मोरोक्कोने दुसर्‍या क्रमांकाच्या बेल्जियमला चक्क 2-0 ने पराभूत करून चमत्कार केला आहे. तर गत 2018 च्या उपविजेत्या क्रोएशियाला बरोबरीत रोखून पहिल्या क्रमांकाने पहिल्या 16 मध्ये प्रवेश केला होता. तर राऊंड ऑफ 16 मध्ये मोरोक्कोने दुसरा चमत्कार करून 2010 च्या विश्वविजेत्या स्पेनला पराभूत करून पहिल्या आठमध्ये स्थान ग्रहण केले आहे.

पोर्तुगालचा पहिल्या सामन्यात घानावर 3-2 असा निसटता विजय, उरुग्वेवर 2-0 असा सहज विजय तर साऊथ कोरियाकडून 1-2 असा पराभव असा साखळीतील प्रवासा होता. त्यानंतरच्या महत्त्वाच्या राऊंड ऑफ 16 च्या बाद फेरीच्या सामन्यात पोर्तुगालचा आणि सर्व फुटबॉल जगताचा हिरो रोनाल्डोला बाहेर बसवले जाणे आणि त्याच्याऐवजी संघात समावेश केलेल्या रामोसने चक्क हॅट्ट्रिकसह तीन गोल करून पोर्तुगालच्या 6-1 अशा मोठ्या विजयात सर्वात महत्त्वाची कामगिरी करणे हे वेगळेच चित्र बघायला मिळाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com