
नाशिक । प्रतिनिधी Nashik
महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन (Maharashtra Judo Association )आणि कोल्हापूर जिल्हा ज्यूदो असोसिएशन यांच्या वतीने कोल्हापूर येथे 49 व्या ज्युनियर आणि वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धा आणि निवड चाचणी स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांच्या 212 खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
नाशिकच्या वैष्णवी खलानेने 52 किलो वजनी गटात तर दिव्या कर्डेलने 78 किलो वजनी गटात सुंदर खेळ करून सुवर्णपदक मिळवले. आकांक्षा शिंदेने 48 किलो वजनी गटात अंतिम फेरीत चांगला खेळ केला. परंतु तिला एक गुणाच्या फरकामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तनुजा वाघनेही चांगला खेळ करत 70 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली.
नाशिकच्या खेळाडूंच्या या कामगिरीमुळे दिव्या कर्डेल आणि वैष्णवी खलाने यांची महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झाली आहे. दि.16 ते 20 डिसेंबरदरम्यान रांची येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत या खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.
या राज्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाशिकच्या विरेंद्र शिंदे, पृथ्वीराज रहाणे, आयुष विघे, मृणली जोशी यांनीही चांगला खेळ केला. परंतु त्यांना पदकापर्यंत मजल मारता आली नाही. अजिंक्य वैद्य आणि गौरव पगारे यांनी संघ व्यवस्थापक म्हणून जबाबदारी पार पाडली.
विद्यापीठ स्पर्धेतही कामगिरी
नाशिक विभागाच्या आंतरमहाविद्यालयीन ज्यूदो स्पर्धेत आकांक्षा शिंदेने 48 किलो वजनी गटात, करुणा थत्तेकरने 52 किलो गटात तर दिव्या कर्डेलने 78 किलो वजनी गटात सहज विजय मिळवत सुवर्णपदके पटकावली. या सुवर्ण कामगिरीमुळे या तीनही खेळाडूंची पुणे विद्यापीठाच्या संघामध्ये निवड झाली आहे. नाशिकच्या या खेळाडूंना प्रशिक्षक विजय पाटील आणि योगेश शिंदे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.