Euro Cup 2020 : यूरो चषकावर 'इटली'ने कोरले नाव, इंग्लंडचा स्वप्नभंग

Euro Cup 2020 : यूरो चषकावर 'इटली'ने कोरले नाव, इंग्लंडचा स्वप्नभंग

दिल्ली | Delhi

जगातील दुसरी सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा युरो कप २०२० (Euro Cup 2020) ११ जुलै रोजी समाप्ती झाली. लंडन येथील वेंबली स्टेडियमवर (Wembley Stadium London) खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआउटमध्ये लागला.

युरो कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा (England) पेनल्टी शूटआऊटवर पराभव करून इटलीनं (Italy) दुसऱ्यांदा युरो चषकावर आपलं नाव कोरलं. तब्बल ५३ वर्षांच्या अंतरानं इटलीनं युरो चषक स्पर्धेच्या विजेतेपदाचा हा मान मिळवला. विजेतेपदासाठीचा हा सामना निर्धारित वेळेत आणि त्यानंतरच्या अतिरिक्त वेळेतही चांगलाच रंगला.

स्पर्धेतील सर्वात जलद गोल करत दणदणीत सुरुवात करणाऱ्या इंग्लंडचा या सामन्यातील शेवट मात्र कडू ठरला. पहिल्या सत्रात इंग्लंडने एक तर दुसऱ्या सत्रात इटलीने गोल करत बरोबरी साधली होती. ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही सामन्याचा निकाल समोर आला नव्हता. पेनल्टी शू़टआउटमध्ये जेडन सँचो, साका आणि रॅशफोर्ड हे खेळाडू इंग्लंडसाठी गोल करण्यात अपयशी ठरले.

५५ वर्षांच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी इंग्लंड या सामन्यात तयारीने उतरलेला होता. दुसऱ्याच मिनीटाला इटलीच्या डिफेन्स लाईन-अपमधली चूक पकडत इंग्लंडच्या के ट्रिपीयरने दिलेल्या पासवर इंग्लंडच्या ल्यूक शॉने गोल झळकावला. युरो कप स्पर्धेतला हा सर्वात जलद गोल ठरला. पहिल्या हाफमध्ये इटलीने प्रयत्नांची पराकाष्टा करुनही ते बरोबरी साधण्यात अपयशी ठरले.

दुसऱ्या सत्रात इटलीने आपल्या रणनितीमध्ये बदल करत मैदानात उतरायचं ठरवलं. ६७ व्य़ा मिनीटाला लिओनार्डो बोनसीने गोल झळकावत इटलीला १-१ बरोबरी मिळवून दिली. यानंतर निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटला आणि पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीने बाजी मारली. दरम्यान युरो कप स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या इतिहासात आतापर्यंतचा सर्वात वेगवान गोल इंग्लंड विरुद्ध इटली सामन्यात नोंदवला गेला. इंग्लंडने १:५७ मिनीटाला गोल करत सामन्यात आघाडी घेतली. इटलीनेही दुसऱ्या हाफमध्ये गोल झळकावत आपण हा सामना सहजासहजी सोडणार नसल्याचं सांगितलं. विशेषकरुन उत्तरार्धात इटलीने केलेला खेळ पाहून इंग्लंडच्या पाठीराख्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला पहायला मिळत होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com