
मुंबई | Mumbai
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर २ वेळच्या आयपीएल विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सशी (Kolkata Knight Riders) भिडणार आहे. हा सामना सायंकाळी ७:३० वाजता खेळवण्यात येणार आहे....
कोलकाता संघाचे ८ सामन्यांमध्ये ३ विजय आणि ५ पराभवांसह ६ गुण आहेत. दिल्लीवर मात करून सलग ४ सामन्यातील पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी कोलकाता आज मैदानात उतरणार आहे.
दुसरीकडे ७ सामन्यांमध्ये ३ विजय आणि ४ पराभवांसह ६ गुणांनी दिल्ली यंदाच्या गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो असा असणार आहे. विजयी संघाला बाद फेरीतील आपलं आव्हान कायम ठेवण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
तर पराभूत संघाची वाट अधिक बिकट होणार आहे. आयपीएलमध्ये (IPL) ब्रेबॉर्न येथे झालेल्या पहिल्या साखळी सामन्यात दिल्लीने (DC) कोलकातावर (KKR) ४४ धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली होती.
या सामन्यात दिल्लीच्या विजयात डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, आणि चायनामन फिरकीपटू गोलंदाज कुलदीप यादवची कामगिरी निर्णायक ठरली होती. त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी केकेआर आज नवीन डावपेचांसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तर कोलकातावर दुसऱ्यांदा विजय मिळवण्यासाठी दिल्ली सज्ज आहे.
दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) सर्वच फलंदाज प्रत्येक सामन्यातून चांगली कामगिरी करत आहेत. ब्रेबॉर्न येथे झालेल्या पहिल्या साखळी सामन्यात दिल्लीने २०० पेक्षा अधिक धावा काढून सामन्यावर आपली मजबूत पकड निर्माण केली होती.
आजच्या निर्णायक लढतीतही दिल्ली संघाला मोठी धावसंख्या उभारावी लागेल. दुसरीकडे अष्टपैलू ललित यादव आणि शार्दूल ठाकूर कडून संघाला चांगली कामगिरी अपेक्षित असेल.
कोलकाता संघात (Kolkata Knight Riders) सातत्याने करण्यात येणारे बदल यामुळे संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. मागील ३ सामन्यांमध्ये संघाच्या सलामीवीरांची जोडी सातत्याने बदलण्यात आली. आंद्रे रसेल आणि श्रेयस अय्यर वगळता एकाही फलंदाजाला आपल्या अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही.
नितीश राणा, व्यंकटेश अय्यर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले आहेत. दुसरीकडे आंद्रे रसेल, उमेश यादव आणि टीम साऊदी वगळता एकाही गोलंदाजाला आपल्या अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही.
आजच्या सामन्यात कोलकाता संघात काही बदल अपेक्षित आहेत. नितीश राणाच्या जागी अजिंक्य रहाणे तसेच यष्टीरक्षक फलंदाज सॅम बिलींग्ज जागी शेल्डन जॅक्सन तर वरुण चक्रवर्तीच्या जागी अष्टपैलू मोहंमद नाबीला अंतिम ११ मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यात श्रेयस अय्यर, सुनील नारायण, आंद्रे रसेल, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ हे स्टार प्लेअर्स असतील.
सलिल परांजपे, नाशिक.