चेन्नई सुपरकिंग्ज विजयी चौकारासाठी सज्ज

चेन्नई सुपरकिंग्ज विजयी चौकारासाठी सज्ज

मुंबई | Mumbai

आयपीएल २०२१ मध्ये आज रविवारी डबल हेडर सामने खेळवण्यात येणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात येणार आहे. आरसीबी संघ यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात आहे. चेन्नईवर मात करून आपला पाचवा विजय मिळवण्यासाठी आरसीबी सज्ज आहे.

आरसीबी गुणतालिकेत ८ गुणांसह अव्वल तर सीएसके ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आरसीबीने आतापर्यंत कोलकाता , मुंबई , राजस्थान आणि हैद्राबाद या चारही चॅम्पियन संघाना पराभवाची धूळ चारली आहे. आता चेन्नईवर मात करून आपला विजयी धडाका कायम ठेवण्यासाठी आरसीबी संघाने जय्य्त तयारी सुरु केली आहे.

आरसीबी आणि सीएसके हे दोन संघ आतापर्यंत एकूण २६ वेळा एकमेकांसमोर आले असून, यात चेन्नईने १६ तर आरसीबीने ९ सामन्यात विजय संपादन केला आहे. तर १ सामना अनिर्णित राहिला आहे . आरसीबी संघासाठी जमेची बाजू म्हणजे देवदत्त पडिकल आणि विराट कोहलीला फॉर्म गवसला आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि अब्राहाम डिव्हिलिअर्स फॉर्मात आहेत.

फलंदाजीप्रमाणे गोलंदाजही सातत्यपुर्ण कामगिरी करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान देत आहेत.

तर दुसरीकडे चेन्नई संघाबद्दल सांगायचे झाले तर फॅफ डू प्लेसिस , आणि ऋतुराज गायकवाड यांनी कोलकात्याविरुद्ध शानदार अर्धशतक ठोकून आपल्यालाही लय गवसली असल्याचे सिद्ध केले आहे.

मोईन अलीही फलंदाजी आणि गोलंदाजीतून आपले योगदान देत आहे. मात्र अंबाती रायडू आणि महेंद्रसिंग धोनीला आपल्या अपेक्षेनुसार अद्याप कामगिरी करता आलेली नाही. त्यांना आपली कामगिरी सुधारण्याची संधी आहे .

गोलंदाजीत दीपक चाहर , सॅम करण , आणि रविंद्र जडेजा चमकदार कामगिरी करत आहे. विशेष म्हणजे मोक्याच्या क्षणी विकेट्स काढून संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाचे योगदान देत आहेत. शिवाय क्षेत्ररक्षणातही चेन्नईच्या संघाने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.

गोलंदाज दीपक चाहर याने कोलकाता आणि पंजाबविरुद्ध सामन्यात बळींचा चौकार मारून सुपरकिंग्जच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. त्याच्याकडून बंगळुरविरुद्ध अशीच कामगिरी सीएसके संघाच्या समर्थकांना असेल.

- सलिल परांजपे, नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com