
मुंबई । Mumbai
बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात दुसरा कसोटी सामना गुरूवारपासून (२२ डिसेंबर) ढाका येथे खेळला जात होता. या सामन्यात भारताने सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी (२५डिसेंबर) ३२२ विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. ज्यामुळे भारताने दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी जिंकली आहे.
सामन्याच्या चौथ्या दिवशी खेळ सुरू झाला तेव्हा अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट क्रीजवर होते. उनाडकटने १६ चेंडूत १३ धावा केल्यानंतर शाकिबच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाला. त्याच्यानंतर ऋषभ पंतही पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या डावात ९३ धावांची शानदार खेळी करणाऱ्या पंतला दुसऱ्या डावात केवळ नऊ धावा करता आल्या. त्याला मेहदी हसन मिराजने एलबीडब्ल्यू केले. मेहदी एवढ्यावरच थांबला नाही. अक्षर पटेलला क्लीन बॉलिंग देत त्याने डावातील पाचवे यश मिळविले. अक्षरने ६९ चेंडूत ३४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.
७४ धावांवर टीम इंडियाच्या सात विकेट पडल्या तेव्हा बांगलादेश चमत्कार करू शकेल असे वाटत होते. भारतीय संघ दडपणाखाली होता. येथून श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विनने डाव सांभाळला. आपल्या अनुभवाचा चांगला उपयोग करून दोघांनी ७१ धावांची नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. अश्विन ६२ चेंडूत ४२ तर श्रेयस अय्यरने ४६ चेंडूत २९ धावा केल्या.
तत्पूर्वी, या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा त्यांचा निर्णय पूर्णपणे बरोबर असल्याचे सामन्यातील परिस्थितीवरून दिसत होते, कारण भारतीय संघ धावांचा पाठलाग करताना अतिशय नाजूक अवस्थेत होता. यजमानांचा पहिलाच डाव २२७ धावसंख्येवर उरकला. दुसऱ्या डावातही त्यांना साजेशी कामगिरी करता आली नाही. संपूर्ण संघ अवघ्या २३१ धावांवर गारद झाला.