
मुंबई | Mumbai
आयपीएलमध्ये (IPL) आज डिफेंडिंग चॅम्पियन्स चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाशी होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सायंकाळी ७:३० वाजता खेळवण्यात येणार आहे....
बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी चेन्नई (CSK) संघाला आज मुंबईविरुद्ध (MI) विजय अनिवार्य असणार आहे. आयपीएल १५ मध्ये पहिल्या साखळी सामन्यात चेन्नईने मुंबईचा पराभव केला होता. आता या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मुंबई इंडियन्स आज मैदानात उतरणार आहे.
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आतापर्यंत एकूण ३५ वेळा एकमेकांशी भिडले आहेत. यात चेन्नईने १५ तर मुंबईने २० विजय मिळवले आहेत. मागील ५ सामन्यांच्या दोन्ही संघाच्या कामगिरीवर नजर टाकल्यास चेन्नईने ३ तर मुंबईने २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
मुंबई इंडियन्स (MI) संघाची कामगिरी यंदाच्या सत्रात निराशाजनक राहिली आहे. संघाचे फलंदाज आणि गोलंदाज सपशेल अपयशी ठरले आहेत. रोहित शर्माची बॅट अद्याप मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरली आहे.
शिवाय संघाचा मधल्या फळीतील भरवशाचा आणि अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव आयपीएल स्पर्धेच्या उर्वरीत सामन्यांमधून बाहेर पडून मायदेशी परतला आहे. मुंबई इंडियन्स संघातील केवळ ३ खेळाडूंना आजवर झालेल्या सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी साकारता आली आहे.
तर गोलंदाजीचा विचार केल्यास जसप्रीत बुमराह आणि मुरुगन अश्विन यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. बुमराहने ११ सामन्यांमध्ये १० तर फिरकीपटू मुरुगन अश्विन याने ९ गडी बाद केले आहेत.
चेन्नई सुपरकिंग्ज संघाला आपल्या फलंदाजी क्रमात बदल करण्याची गरज आहे. तसेच सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेवीन कॉन्व्हे फॉर्मात आहेत. पण त्यांनंतरच्या सर्व फलंदाजांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव दिसून आला आहे.
रॉबिन उथप्पा, शिवम दुबे, अंबाती रायडू यांना अधिक जवाबदारीने आपला खेळ करावा लागणार आहे. कर्णधार एम. एस. धोनी संघासाठी फिनिशरची कामगिरी चांगली करत आहे.
पण चेन्नई संघाच्या उर्वरीत ३ सामन्यापूर्वी चेन्नई संघाला एक मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू रविंद्र जडेजा दुखापतीमुळे आयपीएलबाहेर गेला आहे. चेन्नई संघाला त्याची अनुपस्थिती आज प्रकर्षाने जाणवेल यात काही शंका नाही.
शिवाय गोलंदाजीत डीजे ब्रावो , मुकेश चौधरी आणि महेश तीक्षणा यांनी १० पेक्षा अधिक गडी बाद केले आहेत. तर अष्टपैलू मोईन अलीने ७ सामन्यांमध्ये ५ विकेट्स काढल्या आहेत. आजच्या सामन्यात ईशान किशन, कायरन पोलार्ड, रोहित शर्मा, धोनी, ऋतुराज गायकवाड हे स्टार प्लेअर्स असतील.
सलिल परांजपे, नाशिक.