CSK vs SRH : आज चेन्नई सुपर किंग्स आणि हैद्राबाद भिडणार

CSK vs SRH : आज चेन्नई सुपर किंग्स आणि हैद्राबाद भिडणार

शारजा | Sharjah

आयपीएल २०२१ (IPL 2021) मध्ये आज गुरुवारी २०१६ चा आयपीएल चॅम्पियन सनराईझर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) आता चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघावर मात करण्यासाठी उत्सुक आहे...

शारजा मैदानावर दोन्ही संघांमध्ये सामना खेळवण्यात येणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण सायंकाळी ७:३० वाजता करण्यात येणार आहे.

हैद्राबाद संघाच्या (SRH) खात्यात १० सामन्यांमध्ये २ विजय आणि ८ पराभवांसह ४ गुण आहेत. यंदाच्या विवो आयपीएलमधील आपला तिसरा विजय नोंदवण्यासाठी हैद्राबाद सज्ज आहे.

दोन्ही संघात अनेक अनुभवी आणि मातब्बर खेळाडूंचा भरणा असल्यामुळे एक रोमांचक सामना पाहण्यासाठी सर्व आयपीएल (IPL) प्रेमी सज्ज झाले आहेत.

हैद्राबाद संघ बाद फेरीच्या शर्यतीतून बाद झाला असल्यामुळे या सामन्यात विजय संपादन करून आपला विजयी सिलसिला कायम ठेवण्यासाठी हैद्राबाद चेन्नईला (CSK) नमवण्यात यशस्वी होणार का? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राजस्थान रॉयल्सविरुद्ध (RR) मिळवलेल्या विजयाने हैद्राबाद संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. मात्र हैद्राबाद संघाचे आघाडीचे सर्व फलंदाज संघाला चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरले आहे.

डेविड वॉर्नर, मनीष पांडे, केदार जाधव यांनी संघासाठी निराशाजनक कामगिरी केल्यामुळे हैद्राबाद संघाच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला आहे.

राजस्थान रॉयल्सविरुद्ध गोलंदाजांनी जबरदस्त कमबॅक करताना राजस्थान रॉयल्स संघाला २० षटकात १६४ धावांवर रोखले होते. या सामन्यात सलामीवीर जेसन रॉय याला डेविड वॉर्नरच्या जागी संघात संधी देण्याचा कर्णधार केन विलियम्सनचा निर्णय योग्य असल्याचे जेसन रॉयने झळकावलेल्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर दाखवून दिले होते.

शिवाय कर्णधार केन विलियम्सन आणि अष्टपैलू अभिषेक शर्मा यांनी केलेल्या निर्णायक फलंदाजीमुळे हैद्राबाद संघाला विजय मिळवून दिला होता.

चेन्नई संघाच्या दृष्टीने हा सामना महत्वाचा असणार आहे. कोलकाताविरुद्ध (KKR) अखेरच्या चेंडूवर विजय मिळवल्यामुळे चेन्नईचे हौसले बुलंदीवर आहेत. आता हैद्राबादवर विजय संपादन करून बाद फेरीत आघाडीच्या दोन स्थान मिळवणारा पहिला संघ बनण्याची संधी चेन्नई संघाला चालून आली आहे.

चेन्नई संघाचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. कोलकाताविरुद्ध ऋतुराज गायकवाड, मोईन अली आणि फाफ डू प्लेसिस वगळता एकाही फलंदाजाला आपल्या अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही. धोनी, सुरेश रैनाचे फलंदाजीतील अपयश हा संघासाठी चिंतेचा विषय आहे. यांना आपली कामगिरी सुधारण्याची संधी आहे.

सलिल परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.