बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी : आज पहिला सामना

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी : आज पहिला सामना

भारतीय संघ पाहुण्यांवर विजय मिळवण्यासाठी सज्ज

नागपूर । वृत्तसंस्था Nagpur

भारत आणि ऑस्ट्रेलिया ( IND Vs Aus )यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा (Border-Gavaskar Trophy)पहिला सामना नागपुरात विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दि. 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. भारतीय संघ घरच्या परिस्थितीचा पुरेपूर फायदा उचलून पाहुण्यांवर विजय मिळवण्यासाठी जोर लावणार आहे. ही मालिका जिंकून आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये जागा पक्की करण्याचे टीम इंडियाचे ध्येय आहे.

या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा कोणत्या अंतिम 11 खेळाडूंची निवड करतो याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण त्याआधी विविध मंडळींनी नागपूर कसोटीसाठी त्यांची प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी तर उपकर्णधार लोकेश राहुल यालाच ऑप्शनमध्ये ठेवल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

रवी शास्त्रींनी भारतीय संघाला ही मालिका 4-0 अशी जिंकण्यासाठी जोर लावा, असा सल्ला दिला आहे. 2017 नंतर ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथमच भारत दौर्‍यावर कसोटी मालिकेसाठी आला आहे. तेव्हा भारताने चुरशीच्या मालिकेत 2-1 असा विजय मिळवला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियात 2018-19 व 2020-21 मध्ये झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारताने दोन्ही वेळेस 2-1 अशी मालिका जिंकून इतिहास रचला.

2023 मध्ये भारतात होणार्‍या या मालिकेत विजय मिळवून जागतिक स्पर्धेची फायनल, हेही ध्येय टीम इंडियासमोर आहे. रवी शास्त्री यांनी त्यांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये रोहित शर्मासह ओपनिंगसाठी लोकेश राहुल व शुभमन गिल यांच्यापैकी एक असा पर्याय ठेवला आहे. चेतेश्वर पुजारा व विराट कोहली यांचे स्थान कायम आहे. सूर्यकुमार यादवला त्यांनी पदार्पणाची संधी दिली आहे. तर यष्टिरक्षकासाठी के.एस. भरत व इशान किशन हे पर्याय त्यांनी ठेवले आहेत. रवींद्र जडेजा, आर. अश्विन व कुलदीप यादव या तीन फिरकीपटूंसह मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज हे शास्त्रींच्या संघात आहेत.

कार्तिकने निवडलेल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये शुभमग गिल याचे नाव दिसले नाही. त्याशिवाय कुलदीप यादव यालाही संधी दिली गेलेली नाही. कार्तिकने सलामीसाठी लोकेश राहुल व रोहित शर्मा यांना प्राधान्य दिले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा व विराट कोहली हा अपेक्षित क्रम आहे. कार्तिकने पाचव्या क्रमांकासाठी शुभमनला वगळून सूर्यकुमार यादवला पदार्पणाची संधी देण्याचा सल्ला दिला. यष्टिरक्षक म्हणून के.एस. भरत त्याच्या संघात आहे. रवींद्र जडेजा, आर. अश्विन व अक्षर पटेल या फिरकीपटूंसह मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज या जलदगती गोलंदाजांचा कार्तिकच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश आहे.

रोहित शर्माचे चोख उत्तर

ऑस्ट्रेलियन मीडियाने टीम इंडियावर खेळपट्टीशी छेडछाड केल्याचा किंवा अयोग्य पद्धतीने खेळपट्टी तयार केल्याच्या आरोपाला टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत चोख उत्तर दिले. रोहित शर्मा म्हणाला, आमचे लक्ष खेळावर आहे, ऑस्ट्रेलियन मीडियाच्या बोलण्यावर नाही. तुम्ही चांगली तयारी केली तर तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. खेळपट्टीकडे पाहू नका, क्रिकेटवर लक्ष केंद्रित करा. नागपूरमध्ये फक्त चांगले खेळून चालणार नाही, तर सर्वच खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करावी लागेल.

भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट आणि सूर्यकुमार यादव.

ऑस्ट्रेलियन संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), अ‍ॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अ‍ॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन आणि डेव्हिड वॉर्नर.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com