नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकचे जेष्ठ क्रीडासंघटक बाबा बोकील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दि. २७ डिसेंबरपासून खुल्या टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाची स्पर्धा केवळ मूक व कर्णबधिर खेळाडूंसाठी असून यशवंत व्यायामशाळा, महाराष्ट्र स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ दि डेफ, यशविद्या फाऊंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे...
गेल्या 14 वर्षांपासून नाशिकचे जेष्ठ क्रीडासंघटक बाबा बोकील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ खुल्या टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्पर्धेचे यंदा १५ वे वर्ष आहे. दि. 27 व 28 डिसेंबर 2022 या कालावधीत स्पर्धा होणार आहे.
उद्घाटन दि. 27 डिसेंबर सायंकाळी चार वाजता यशवंत व्यायामशाळेच्या टेबल टेनिस हॉलमध्ये होईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल. ही स्पर्धा निशुल्क ठेवण्यात आली असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक व टेबल टेनिस प्रशिक्षक शशांक वझे यांनी दिली. शिबिराला व स्पर्धेला येण्याची व जाण्याची संपूर्ण जबाबदारी खेळाडूंची वैयक्तिक असेल.
यात जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील, महाराष्ट्र स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ़ दि डेफचे मानद सचिव गोपाळ बिरारे, सल्लागार राजेंद्र शिंदे, क्रीडा संघटक आनंद खरे, रवींद्र मेतकर, नितीन हिंगमिरे यांनी केले आहे.