ICC T-20 World Cup 2021 : न्यूझीलंडला नमवून ऑस्ट्रेलिया विश्वविजेता

ICC T-20 World Cup 2021 : न्यूझीलंडला नमवून ऑस्ट्रेलिया विश्वविजेता

दुबई | वृत्तसंस्था

ICC T20 World Cup 2021 स्पर्धेच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला नमवून विश्वविजेतेपद मिळविले.

ऑस्ट्रेलियाचा कप्तान आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना मार्टिन गप्टिल आणि डॅरिल मिशेल यांनी न्यूझीलंडसाठी सलामी दिली. चौथ्या षटकात वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने मिशेलला झेलबाद केले.

पाच षटकात न्यूझीलंडने १ बाद ३० धावा केल्या.मिचेल मार्शने टाकलेल्या नवव्या षटकात न्यूझीलंडने अर्धशतक पूर्ण केले. विल्यमसनने या षटकात दोन चौकार ठोकले. नऊ षटकात न्यूझीलंडने १ बाद ५१ धावा केल्या.

झम्पाने १२व्या षटकात गोलंदाजीला येत संथ खेळणाऱ्या गप्टिलला तंबूत पाठवले. गप्टिलने २८ धावा केल्या. त्याच्यानंतर ग्लेन फिलिप्स मैदानात आला . १२ षटकात न्यूझीलंडने २ बाद ८१ धावा केल्या.१३व्या षटकात विल्यमसनने आक्रमक पवित्रा धारण करत मॅक्सवेलला दोन षटकार खेचले. याच षटकात त्याने अर्धशतक पूर्ण केले. १७ षटकात न्यूझीलंडने २ बाद १४४ धावा केल्या. १८व्या षटकात फिलिप्स (१८) आणि विल्यमसन (८५) झेलबाद झाला. हेझलवूडने दोघांना माघारी धाडले.२० षटकात न्यूझीलंडने ४ बाद १७२ धावा केल्या.

१७३ धावांचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी ऑस्ट्रेलियासाठी सुरुवात केली. तिसऱ्या षटकात ट्रेंट बोल्टने फिंचला (५) माघारी धाडले. डॅरिल मिशेलने फिंचचा झेल घेतला. मिचेल मार्शने डाव सावरत फिरकीपटू ईश सोधीने टाकलेल्या सातव्या षटकात ऑस्ट्रेलियाने अर्धशतक पूर्ण केले. यानंतर मार्श-वॉर्नर यांनी जोरदार फटकेबाजी केली.

११व्या षटकात वॉर्नरने नीशमला जोरदार षटकार ठोकत अर्धशतक फलकावर लावले. बोल्टने १३व्या षटकात गोलंदाजीला येत ही भागीदारी मोडली. त्याने वॉर्नरची दांडी गुल केली. वॉर्नरने ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावा केल्या. वॉर्नरनंतर ग्लेन मॅक्सवेल मैदानात आला.

मार्शने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. १४व्या षटकात त्याने अर्धशतक पूर्ण केले. १९व्या षटकात ऑस्ट्रेलियाने विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मार्शने ६ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७७ धावा केल्या, तर मॅक्सवेल २८ धावांवर नाबाद राहिला.१९ व्या षटकात ऑस्ट्रेलियाने विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ऑस्ट्रेलियाला प्रथमच टी-२० वर्ल्डकप विजेतेपद मिळाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com