
ब्रिस्बेन | Brisbane
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेला दि. १७ डिसेंबर २०२२ पासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना उद्या ब्रिस्बेनच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार पहाटे ५:५० ला सोनी सीक्सवर करण्यात येणार आहे...
ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद पॅट कमिन्स भूषवणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेचे कर्णधारपद डीन एल्गारकडे असणार आहे. दोन्ही संघ मालिकेतील सलामी सामन्यात विजय संपादन करण्यासाठी सज्ज असणार आहेत.
आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सध्याच्या गुणतालिकेचा विचार केल्यास ऑस्ट्रेलिया संघाला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.
मात्र दुसऱ्या स्थानासाठी दक्षिण आफ्रिका , भारत , श्रीलंका शर्यतीत आहेत. तीन सामन्यांची कसोटी मालिका जिंकून दक्षिण आफ्रिका आपलं अव्वल स्थान मिळवण्याचा पुन्हा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे यजमान ऑस्ट्रेलिया कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अव्वल स्थान अधिक भक्कम करण्यासाठी सज्ज असणार आहे. सामन्याला सुरुवात होण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाने आपले अंतिम ११ खेळाडू जाहीर केले आहेत.
यामध्ये नियमित कर्णधार पॅट कमिन्स संघात कमबॅक झालं आहे. ऑस्ट्रेलिया संघाने मायदेशात विंडीजविरुद्ध होऊन गेलेल्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० असं निर्भेळ यश संपादन केलं होतं. आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून सलग दुसरी मालिका जिंकण्यासाठी कांगारू संघाचा इरादा असणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजीची मदार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलंड, नेथन लायन, आणि कॅमेरून ग्रीनवर असणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीतही प्रचंड भेदकता आहे. कगिसो रबाडा, मार्को यान्सेन, केशव महाराज, लूंगी इंगिडी आणि एन्रिक नॉरकिया दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचा प्रमुख आधारस्तंभ आहेत. दोन्ही संघांकडे आक्रमक गोलंदाजी असल्यामुळे मालिका अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.