
नवी दिल्ली | New Delhi
चीन येथे सुरु असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (19th Asian Games) भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करत पदकांची लयलूट सुरूच ठेवली आहे. नुकतेच भारताच्या नावावर एकूण १०० पदके झाली आहेत. यात २५ सुवर्ण पदकांची (Gold Medals) कमाई भारतीय खेळाडूंनी केली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा भारताच्या खात्यात सुवर्ण पदकाची भर पडली आहे...
काल म्हणजेच शक्रवारी भारताच्या (India) खात्यात ८६ पदकं होती. त्यानंतर काल दिवसभरात हॉकी (सुवर्णपदक), तिरंदादी (रौप्य व कांस्य पदक), ब्रिज (रौप्य), बॅडमिंटन (रौप्य) व रेसलिंग (३ रौप्य) अशा पदकांची लयलूट केली. यानंतर आज सकाळी भारतीय खेळाडूंनी विजयी कामगिरी करताना तिरंदाजीत तीन, कबड्डीत दोन व बॅडमिंटन आणि पुरुष क्रिकेटमध्ये एक अशा पदकांची निश्चिती केली आहे. त्यामुळे आता भारताची पदकसंख्या शंभरीपार गेली आहे. यानंतर आता भारताच्या अव्वल बॅडमिंटन (Badminton) जोडीने भारताला सुवर्णपदक जिंकून दिले आहे.
भारताची बॅडमिंटन जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी (Satwik Sairaj and Chirag Shetty) यांनी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ च्या बॅडमिंटन पुरूष दुहेरीचे सुवर्ण पदक पटकावले आहे. भारतीय जोडीने कोरियाच्या जोडीचा २१-१८, २१-१६ असा पराभव केला. विशेष म्हणजे भारताचे आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमधील पहिले सुवर्ण पदक आहे.
दरम्यान,आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत भारत सध्या चौथ्या स्थानावर आहे. भारताने एकूण १०० पदके जिंकली आहेत. तर या यादीमध्ये चीन पहिल्या क्रमांकावर असून चीनने ३५६ पदके जिंकली आहेत. त्यात १८८ सुवर्ण, १०५ रौप्य आणि ६३ कांस्य पदकांचा समावेश आहे. तर जपान दुसऱ्या क्रमांकावर असून जपानने ४७ सुवर्णांसह १६९ पदके जिंकली आहेत. तसेच कोरिया तिसऱ्या क्रमांकावर असून कोरियाने ३६ सुवर्ण, ५० रौप्य आणि ८६ कांस्य पदकांसह एकूण १७२ पदके पटकावली आहेत.