उत्कृष्ट खेळाडूला एमसीएच्या संघात संधी : आ.पवार

जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा सुवर्णमहोत्सव साजरा
उत्कृष्ट खेळाडूला एमसीएच्या संघात संधी : आ.पवार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

येत्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या(Maharashtra Cricket Association ) कामकाजात बराच मोठा बदल दिसून येईल. चांगले खेळणार्‍याला एमसीएच्या टीममध्ये खेळण्याची संधी मिळेल असे आश्वासन देतानाच जिल्हा स्तरावरील संघटनांना न्याय देण्यासाठी एमपीएलमध्ये 36 टिमऐवजी 48 टीम म्हणजेच 12 टीम वाढवण्यात आलेल्या आहेत.आगामी काळात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मदतीने 100 टीम खेळवण्याचा मानस असल्याचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष आ.रोहीत पवार ( MLA Rohit Pawar)यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

1952 साली नाशिकला पहिली कसोटी खेळवण्यात आली होती.त्यानंतर धैर्यशील पवार यांनी 1952 नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची ( Nashik District Cricket Association)स्थापना केली.आज संघटना 50 व्या वर्ष पूर्ण करीत आहे. त्या निमित्त आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अजय शिर्के, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष आ. रोहित पवार, आ. देवयानी फरांदे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत, सुरेंद्र भांडारकर, संजय बजाज, संतोष बोबडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात कीर्ती कला मंदिराच्या कलाकारांनी गणेश वंदनाद्वारे केली. यावेळी ध्वनी चित्रफितीद्वारे 50 वर्षाच्या वाटचालीचा आढावा सादर केला. यावेळी प्रास्ताविक करताना जिल्हा अध्यक्ष विनोद शहा यांनी नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य स्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेने सातत्याने प्रयत्न केले. क्रिकेटपटूंना राज्यस्तरावर सन्मान मिळवून देण्यासाठी माजी अध्यक्ष अजय शिर्के यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करुन विनोद शहा यांनी राज्य संघटनेला धन्यवाद दिले. यावेळी माजी अध्यक्ष विलास लोणारी यांनी संघटनेच्या खडतर वाटचालीचा आढावा सादर करताना विविध प्रसंगांचा उल्लेख करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला.

मान्यवरांच्या हस्ते 50 वर्षाच्या वाटचालीचा आढावा असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर स्मरणिका बनवण्यात योगदान देणार्‍या दीपक ओढेकर व अनिल आध्यरु यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आजामाजी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.त्यात प्रामुख्याने अनवर शेख, रमेश वैद्य, राजू लेले, हेमंत पै, शेखर घोष, प्रशांत राय, भगवान काकड, अविनाश आवारे, अमित पाटील, सुयश बुरकूले, अभिषेक राऊत, सलील आगरकर, साजिन सुरेशनाथ, मुर्तूझा ट्रंकवाला, सत्यजित बच्छाव, माया सोनवणे, ईश्वरी सावकार, प्रियंका घोडके, रसिका शिंदे, शाल्मलीक क्षत्रिय, प्रचिती भवर, साहिल पारख, दीर्घ ब्रम्हेचा, व्यंकटेश बेहेरे, प्रतिक तिवारी, शारविंद किसवे, कुणाल कोठावदे, तन्मय शिरोडे, पवन सानप, रामकृष्ण घोष, साई राठोड यांचा समावेश होता. तसेच संदिप चव्हाण, प्रणव कुलकर्णी, सागर देशमुख या पंचांचा सन्मान करण्यात आला.

नाशिकला स्टेडीयमसाठी 28 कोटी

नाशिकला चांगले स्टेडीयम होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. आजच मुंबईच्या बैठकीत नाशिकच्या शिवाजी मैदानावर स्टेडीयम उभारण्यासाठी 28 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. येत्या दोन दिवसांत त्यांचे टेंडर निघणार असल्याचे आ. देवयानी फरांदे यांनी सांगितले. नाशिकचा बलस्थान सांगताना हे खेळाडूंचे गाव आहे. नाशिक हे क्रिकेटचे गाव आहे. जागतिक स्तरावर उत्तम धावपटू देणारे गाव आहे. भिष्मराज बाम सरांनी क्रीडा क्षेत्रावर प्रेम करताना नाशिकला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केल्याचे आ. फरांदे यांनी सांगितले.

पवार साहेबांचा सल्ला

जआपण क्रिकेट असोसिएशन निवडणुकीला सामोरे जाताना शरद पवार यांनी सल्ला दिला होता. आपण राजकारणात आहोत, पण तिथे गेल्यानंतर त्या असोसिएशनमध्ये जर राजकारण असेल तर ते त्या ठिकाणी आधी बाहेर काढायचे. राजकारण बाहेर ठेवून पारदर्शक काम करायचे हा कानमंत्र दिला होता. त्याचे तंतोतंत पालन करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे रोहीत पवार यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com