राइड फॉर ऑटिझमला उत्स्फूर्त प्रतिसाद

तीनशेच्यावर सायकलपटूंचा सहभाग
राइड फॉर ऑटिझमला उत्स्फूर्त प्रतिसाद

औरंगाबाद - aurangabad

दहा वर्षाच्या मुलांपासून ते साठ वर्षांच्या प्रौढांपर्यंत सुमारे तीनशे जणांनी 'राइड फॉर ऑटिझम' (Ride for autism) मध्ये सहभागी होत ऑटिझमबाबत जनजागृतीचा संदेश दिला. एक विशिष्ट ध्येय समोर ठेवून आरंभतर्फे घेण्यात आलेल्या या उपक्रमास औरंगाबादकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ऑटिस्टीक मुलांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी झेंडा दाखवून रॅलीस सुरुवात केली.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांच्यासह शहरातील अनेक मान्यवरांनी दहा किलोमीटर सायकलिंग करत ऑटिझम जनजागृतीच्या या उपक्रमात सहभाग नोंदवला. संपूर्ण आठवडा या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी आरंभ आणि पीसीओडी क्लबच्या वतीने ऑटिझम डे आणि हेमंत देशपांडे यांच्या स्मृतिनिमित्त ही सायकल रॅली घेण्यात आली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते सायकल रॅलीस झेंडा दाखवण्यात आला. यावेळी डॉ. मंगला बोरकर, डॉ, संगीता देशपांडे, जिल्ह्याचे समाजकल्याण अधिकारी शिवराज केंद्रे, आरंभचे अध्यक्ष बाळासाहेब टाकळकर, औरंगाबाद ऑलंम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, चेतन पाटील, वैशाली सुतावणे आणि मिलिंद दामोदरे यांची प्रमुख उपस्थिती होती. आरंभच्या संचालिका अंबिका टाकळकर यांनी प्रास्ताविक केले. ऑटिस्टिक मुलांच्या समस्या इतर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अपंग मुलांच्या समस्यांपेक्षा खूप वेगळ्या आहेत. त्या समजून घेऊन त्यांना आपल्यात सामावून घेतले पाहिजे असे आवाहन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी उपक्रमास शुभेच्छा देताना केले.

गारखेड्यातील विभागीय क्रीडा संकुल येथून सकाळी साडे सहा वाजता सायक्लोथॉनला सुरुवात झाली. सेव्हन हिल, क्रांती चौक ते विट्स हॉटेल सायकल ट्रॅक मार्गे देवगिरी कॉलेज, दर्गा चौक ते पुन्हा विभागीय क्रीडा संकुल असा दहा किलोमिटरचा हा सायक्लोथॉनचा मार्ग होता. सायक्लोथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकास प्रमाणपत्र देण्यात आले. ज्यांनी सायक्लोथॉनमध्ये सहभाग नोंदवला नव्हता त्यांनी झुंबा सेशनचा आनंद घेतला.

नवजीवन मतिमंद मुलांची शाळा तसेच औरंगाबाद पॅरा ऑलंम्पिक संघटनेतर्फे सुमारे पंचविस विशेष मुलांनी यावेळी सहभाग नोंदवला होता. या मुलांना आरंभतर्फे भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. औरंगाबाद जिल्हा सायकल संघटना आणि पीसीओडी क्लबने संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहकार्य केले. तर मंजुषा राऊत, सुनीता गौतम, औरंगाबाद स्पोर्टस फिजीओथेरीपी ग्रुप, फाऊंडेशन, विनीत शर्मा यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून जबाबदारी पार पाडली. औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेचे चरणजित सिंघ संघा, निखिल कचेश्वर, वाडेकर, यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला.

Related Stories

No stories found.