लवकरच औरंगाबाद-नागपूर प्रवास अवघ्या चार तासांचा!

नागपूर ते मुंबई केवळ आठ तासात
लवकरच औरंगाबाद-नागपूर प्रवास अवघ्या चार तासांचा!

औरंगाबाद - Aurangabad

समृद्धृी महामार्गात (Highway) औद्योगिकीकरणाच्या दृष्टीने औरंगाबाद हे केंद्रस्थान ठरले आहे. येथून मुंबई ते औरंगाबाद (Mumbai to Aurangabad) प्रवासाचा कालावधी 4 तास व औरंगाबाद ते नागपूर (Aurangabad to Nagpur) आणखी 4 तास लागतील. परिणामी, मराठवाड्यातून मुंबई आणि नागपूरकडील बाजारपेठेत शेतमाल वाहतुकीला गती मिळेल. औरंगाबादेतून आजवर पुणे, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना (Pune, Nanded, Parbhani, Hingoli, Jalna) या बाजारपेठेतच शेतमाल व भाजीपाल्याची वाहतूक होते, तिला आता नागपूर व मुंबईकडील बाजारपेठांचे नवीन पर्याय खुले होतील.

स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) या नावाने महाराष्ट्र (Maharashtra) समृद्धी महामार्ग हा दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोर (डीएमआयसी DMIC) आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरशी जोडला जाणार आहे. या एक्स्प्रेस वेमुळे नागपूर ते मुंबई हे 701 किलोमीटरचे अंतर केवळ 8 तासात कापता येईल. यामुळे मराठवाडा व विदर्भातील शेतमाल वाहतुकीला गती मिळेल, दुग्ध व्यवसायाची बाजारपेठ वाढेल, कृषी समृद्धी नगरांमुळे या मार्गाशी जोडलेल्या शहरी व ग्रामीणमधील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. परिणामी, ग्रामीणमधून शहरात होणारे स्थलांतरदेखील कमी होईल, असा वादा राज्य सरकारने केलेला आहे.

समृद्धी महामार्ग हा आजवरचा राज्य सरकारचा बिग प्रकल्प मानला जात आहे. या महामार्गाचे काम दोन टप्प्यात केले जात आहे. सध्या पहिल्या टप्प्यात 701 किलोमीटरच्या महामार्गाचे काम सुरू असून सुमारे 50 टक्के काम पूर्णत्वास आले आहे. आगामी काळात दुसर्‍या टप्प्यात कृषी समृद्धीनगरे विकसित केली जाणार आहेत. हा मार्ग जालना, औरंगाबादसह प्रमुख दहा शहरांना जोडणार आहे. 392 गावांशी प्रत्यक्ष जोडला जाणारा हा मार्ग इतर 14 जिल्ह्यातील शहरांशीही अप्रत्यक्षपणे जोडला गेला आहे. परिणामी, राज्यातील 24 जिल्ह्यांतील दळणवळणाला यामुळे गती मिळेल.

हा एक्स्प्रेस वे आणि त्याचे फीडर नेटवर्क शिर्डी, वेरूळ, लोणार, अजिंठा आदी पर्यटनस्थळांनाही जोडणार असून तेथील पर्यटनाच्या विकासालाही चालना मिळेल. हा महामार्ग विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकसनशील भागात आर्थिक घडामोडींना गती देईल. कृषी समृद्धी नगरे आणि कृषी आधारित उद्योग जे महामार्गाभोवती निर्माण केले जाणार आहेत, त्यामुळे स्वयंरोजगार व इतर रोजगाराच्या संधी अधिकच्या उपलब्ध होतील. शेतीमालास विविध बाजारपेठ उपलब्ध होऊन शेतीतील उत्पन्न सुधारण्यास मदत होणार आहे. याअंतर्गत ग्रामीण भागात बिगर शेती आधारित रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. त्यासाठीच दोन ड्रायपोर्ट, 19 कृषी समृद्धी नगरे सरकार विकसित करणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या महामार्गावर सर्व ती खबरदारी घेतली आहे. महामार्गाच्या बाजूने वृक्षारोपण करून प्रदूषण कमी करण्याचाही प्रयत्न आहे. प्रवाशांना पर्यटनस्थळांवर सहज जाता येईल, वाय-फाय कनेक्टिव्हिटीसह इतर शहरांशी जोडण्यासाठी आवश्यक रस्त्यांची कामेही केली जाणार आहे.

समृद्धी महामार्गावर वर्धा व जालना येथील ड्रायपोर्ट, नवीन औद्योगिक वसाहती, कृषी समृद्धीनगरे निर्माण होणार आहेत. समृद्धी महामार्गामुळे औरंगाबादच्या डीएमआयसीत नवीन उद्योग येतील. परिणामी, रोजगाराच्या संधीही वाढतील. त्यामुळे पुढील दोन दशकांत सुमारे दोन लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल.

दिल्ली-मुंबई औद्योगिक महामार्ग, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट हायवे आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी JNPT) यांनी स्थापित केलेले थेट दुवे माल, शेतमाल, दुग्धजन्य पदार्थ यांसह लोकांची देशी व परदेशी बाजारपेठेत जलद व सुलभ वाहतूक होणार आहे. वर्धा व जालना येथे ड्रायपोर्ट (कोरडे बंदर) उभारले जाणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतमाल जेएनपीटीकडे नेणे सोपे होईल. परिणामी, शेतकर्‍यांच्या आर्थिक विकासाला चालना मिळून मराठवाडा व विदर्भाचा स्थानिक जीडीपी वाढेल, असा विश्वास सरकारने या प्रकल्पाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

जोडलेले प्रमुख 10 जिल्हे

औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक, ठाणे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा (Aurangabad, Jalna, Ahmednagar, Nashik, Thane. Nagpur, Wardha, Amravati, Washim, Buldhana)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com