लवकरच सर्वसामान्य प्रवाशांना करता येईल 'जनरल' तिकिटावरही प्रवास

मध्य, पश्चिम, पूर्व आणि दक्षिण-पूर्व विभागांना सूचना 
लवकरच सर्वसामान्य प्रवाशांना करता येईल 'जनरल' तिकिटावरही प्रवास

औरंगाबाद - Aurangabad

लवकरच सर्वसामान्य किंवा 'जनरल' प्रवाशांनाही नियमित रेल्वेतून 'जनरल' तिकिटावर प्रवास करता येणार आहे. रेल्वे मंड‌ळाने रेल्वे विभागांना सुरक्षित अंतर ठेवून 'जनरल' तिकीट विकण्याबाबत मान्यता दिली आहे. सध्या हे आदेश विभागीय कार्यालयांना देण्यात आले आहेत, मात्र हे आदेश विभागीय रेल्वे कार्यालय तसेच रेल्वे स्टेशनपर्यंत देण्यात आलेले नाहीत.

'लॉकडाऊन'च्या काळात रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. 'अनलॉक' झाल्यानंतर पुन्हा रेल्वे सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांत औरंगाबाद रेल्वे मार्गावरही नियमित प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

सध्या औरंगाबादसह देशभरात विशेष रेल्वे म्हणून प्रवासी रेल्वे चालविण्यात येत आहे. विशेष रेल्वेतून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना तिकीट आरक्षित करण्याचा नियम लावण्यात आला आहे. यामुळे शहराच्या आसपासच्या भागातून जाणाऱ्या किंवा येणाऱ्या प्रवाशांची अडचण झाली होती. सर्वसामान्य जनतेला रेल्वे प्रवास करण्यासाठी अनारक्षित रेल्वे तिकीट व्यवस्था सुरू करण्याबाबत रेल्वे बोर्डाकडे विनंती केली होती.

या विनंती पत्राबाबत रेल्वे बोर्डाच्या (सह संचालक, प्रवासी विपणन एक) विपुल सिंघल यांच्या सहीने निघालेल्या पत्रात रेल्वे बोर्डाने एटीव्हीएम, यूटीएस, कोव्हीटीएम याद्वारे अनारक्षित तिकीट वाटपाबाबत देशभरातील झोनल रेल्वे कार्यालयांना तिकीट देण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. तिकीट वाटप करताना सुरक्षित अंतर ठेवून तिकीट विक्री करावी, असे आदेश देण्यात आले आहे.

देशभरातील मध्य, पश्चिम, पूर्व आणि दक्षिण-पूर्व या चार विभागात अनारक्षित रेल्वे तिकीट देण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. या चार विभागांव्यतिरिक्त अन्य विभागात अनारक्षित तिकीट देण्याची सेवा सुरू करण्याबाबत सूचना रेल्वे बोर्डाने केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com