औरंगाबाद शहरात पॉझिटिव्हिटी रेटमध्ये लक्षणीय घट

ग्रामीण भागात संसर्गाचा उद्रेक
औरंगाबाद शहरात पॉझिटिव्हिटी रेटमध्ये लक्षणीय घट

औरंगाबाद - Aurangabad

मार्च महिन्यात शहरात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे चित्र होते. मात्र एप्रिल महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून शहरातील चित्र बदलू लागले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या घटत असून तुलनेत पॉझिटिव्हिटी रेटमध्ये लक्षणीय घट पहायला मिळत आहे.

मागील महिन्यात पॉझिटिव्हिटी रेट हा तब्बल 33 टक्क्यापर्यंत पोहचला होता. तो केवळ 10 टक्के एवढा नोंदला गेला. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागात संसर्गाचा उद्रेक होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

औरंगाबाद शहरात फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत शहरासह जिल्ह्यातील रोज निघणार्‍या कोरोना बाधितांची संख्या कमी होऊन ती 25 ते 30 पर्यंत खाली आली होती. मात्र 15 फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्ण वाढण्यास सुरूवात झाली आणि अल्पावधीतच कोरोना संसर्गाने शहरासह पूर्ण जिल्ह्यात पाय पसरवण्यास सुरूवात केली.

मार्च महिन्यात तर कोरोनाचा उद्रेक झाला. रोजचे हजारपेक्षा अधिक बाधित नुसते शहरातच निघू लागल्याने आरोग्य यंत्रणा हादरली. त्यामुळे शासन निर्देशान्वये बाधितांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींना शोधून त्यांच्या कोरोना चाचण्या करण्यावर पालिकेच्या आरोग्य यंत्रणेने भर दिला. शहराच्या प्रवेद्वारांवरही पथके तैनात करून प्रत्येकाची चाचणी सुरू केली. रेल्वेस्टेशन, विमानतळ, मध्यवर्ती बसस्थानक येथेही पालिकेने चाचण्यांसाठी पथके तैनात केली. परिणामी, शहरात संसर्गाची वाढती साखळी ब्रेक होत चालली असल्याची चिन्हे मागील आठवडाभरापासून दिसू लागली आहेत.

शहरात कोरोना संसर्गाची साखळी ब्रेक होत चालली असल्याचे चित्र असले तरी अजूनही रोजचे 600 ते 700 रुग्ण नित्याने आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाने देखील खबरदारीसाठी उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता आहे. यात जरासी ढील पुन्हा संसर्ग वाढीस कारणीभूत ठरू शकते, असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com