औरंगाबाद महापालिकेची 'समाधान' हेल्पलाईन

तात्काळ तक्रार निवारण होणार
औरंगाबाद महापालिकेची 'समाधान' हेल्पलाईन

औरंगाबाद - aurangabad

महापालिकेच्या (Municipality) अत्याधुनिक मदत कक्ष 'समाधान' हेल्पलाईनचे (Helpline) लोकार्पण झाले. महापालिकेद्वारे पुरवण्यात येणाऱ्या सेवेसंबंधित मदत हवी असल्यास आता १५५३०४ या क्रमांकावर किंवा www.aurangabadmahapalika.org या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदविता येणार आहे.

तक्रार निवारण व्यवस्थेच्या अभावामुळे नागरिकांना मनपाच्या कार्यालयात खेट्या माराव्या लागतात. वारंवार कार्यालयात येताना वयोवृद्ध महिला व पुरुषांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. मनपा प्रशासक तथा आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी नागरिकांच्या सुविधेसाठी एक विशेष हेल्पलाईन व्यवस्था तयार करण्यासाठी आदेशित केले होते. त्यानुसार मागच्या दीड महिन्यापासून हेल्पलाईनवर युद्धपातळीवर कार्य सुरू होते. यासाठी मनपा उपायुक्त संतोष टेंगळे यांना नोडल अधिकारी नियुक्‍त करण्यात आले आहे. स्मार्ट सिटीतर्फे प्रकल्प व्यवस्थापक फैज अली हेल्पलाईन संबंधित काम बघत आहेत. 'समाधान' हेल्पलाईनच्या माध्यमातून नागरिक विविध समस्या घंटागाडी न येणे, पथदिवे बंद असणे किंवा मोकाट कुत्र्यांचे त्रास, ड्रेनेज मिश्रित पाणी, रस्त्यावरून घाण पाणी वाहने, डासांचा उपद्रव, दुर्गंधी याबद्दल तक्रार नोंदवू शकतात किंवा मालमत्ता कर व पाणी शुल्क भरण्यासंबंधित मदत घेऊ शकतात. ही हेल्पलाईन सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत १५५३०४ वर किंवा ऑनलाईन www.aurangabadmahapalika.org वर नोंदवू शकतात. ही हेल्पलाईन स्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड व कंट्रोल रूममधून संचालित होणार आहे.

ऑनलाईन तक्रार नोंदविण्याचे वैशिष्टे

तक्रार नोंद झाल्यापासून निवारण होईपर्यंत सर्व सिस्टीम ऑनलाईन १५५३०४ वर कॉल करून किंवा ऑनलाइन www.aurangabadmahapalika.org वर तक्रार केल्यानंतर ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे तक्रार संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला वर्ग करण्यात येईल. रेफरेन्स आयडी व अधिकाऱ्यांच्या नावाचा एसएमएस येईल. वेळेत तक्रारीचे निवारण करावे लागेल. अन्यथा ती तक्रार वरिष्ठ अधिकार्‍यांकडे जाईल आणि जर तक्रारीचे निवारण अधिकाऱ्यांकडून न झाल्यास आयुक्तांना वर्ग केली जाईल. तक्रार नोंद झाल्यापासून ते निवारण होईपर्यंत. सर्व माहिती ऑनलाइन डॅशबोर्डवर आयुक्तांकडे उपलब्ध राहील. मनपा आयुक्‍त दर १५ दिवसाला मदत कक्षाचा आढावा घेतील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com