विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने शाळा गजबजल्या

jalgaon-digital
3 Min Read

औरंगाबाद – Aurangabad

कोरोनामुळे (corona) दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा 4 आक्टोबर आजपासून सुरू होत आहे. कोव्हिड 19 बाबतचे सर्व नियम पाळून शहरातील 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यास परवानगी दिली आहे. शहरातील 413 एकूण शाळांची घंटा वाजणार आहे. यात महापालिकेच्या 17 शाळांचा समावेश आहे. शाळा सुरू होणार असल्याने शिक्षकांतही आनंदाचे वातावरण असून आता शाळांत बच्चेकंपनीचा किलबिलाट पुन्हा ऐकायला मिळत आहे.

Photo शाळेची घंटा वाजली, असा दिला विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी प्रवेश

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केलेला आहे. राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियमांच्या तरतूदीनुसार नियमावली प्रसिध्द करण्यात आलेली आहे. महापालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारने लावण्यात आलेले निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद पालिका हद्दीतील 8 वी ते 12 वी पर्यतच्या सर्व माध्यमांच्या शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे आदेश पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी काढले आहेत. त्यानुसार पालिका उपायुक्त संतोष टेंगळे यांच्या उपस्थितीत शाळांच्या मुख्याध्यापक, प्राचार्य यांची बैठक घेण्यात आली. शहरातील खासगी माध्यमिक विभागाच्या तसेच पालिकेच्या अशा एकूण 413 शाळा शहरात सुरू होत आहे. यात पालिकेच्या 17 शाळांचा समावेश आहे. या 413 शाळांमध्ये एकूण 78,000 विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत. तसेच 3,500 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेमध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आहे.

शाळा सुरू करण्यासाठी 48 तासापूर्वीची सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांचे पालन, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांचे लेखी संमतीपत्र घेतले जाणार आहे. ज्या शिक्षक व कर्मचार्‍यांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असतील त्यांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर शाळेत उपस्थित राहावे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन, ऑफलाइन पध्दतीचा पर्याय निवडलेला असले त्यांच्यासाठी शिक्षण पुर्वीप्रमाणे सुरू ठेवावे. सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, खासगी वाहनचालक, कंडक्टर, रिक्षाचालक यांनी दोन्ही लसीकरणाचे डोस घेणे आवश्यक आहे.

पालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासाठी समिती गठीत केलेली आहे. पालिका प्रशासक तथा आयुक्त या समितीचे अध्यक्ष आहेत. सदस्य म्हणून उपायुक्त तथा विभागप्रमुख, सर्व प्रभाग अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी यांचा या समितीमध्ये समावेश राहणार आहे.

पहिला दिवस स्वागताचा

कोरोनामुळे तब्बल दीड वर्षानंतर शाळा सुरू होत आहेत. यामुळे विद्यार्थ्याहसह पालक व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्याची जय्यत तयारी देखील केली आहे. सोमवारी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे प्रत्येक शाळेत जल्लोषात स्वागत केले जाणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *