लसीकरण नसेल तर बुधवारपासून ५०० रुपये दंड

ठिकठिकाणी पथके तैनात
लसीकरण नसेल तर बुधवारपासून ५०० रुपये दंड

औरंगाबाद - Aurangabad

ओमायक्रॉनपासून (Omycron) बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनी तत्काळ लसीकरण करून घ्यावे. दुसऱ्या डोससाठी पात्र असणाऱ्यांनी १५ डिसेंबरपर्यंत लसीकरण करुन घ्यावे, अन्यथा ५०० रुपये दंड ठोठावण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाबाबत औरंगाबाद प्रशासन घेत असलेल्या कठोर निर्णयाची राज्यभरात चर्चा असून, 'औरंगाबाद पॅटर्न' (Aurangabad pattern) आता इतर जिल्ह्यात सुद्धा राबवला जात आहे. त्यातच आता आणखी एका महत्त्वाच्या निर्णयामुळे लसीकरण मोहिमेला आणखी वेग येण्याची अपेक्षा प्रशासनाला आहे.

ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे त्यामुळे पात्र नागरिकांनी तात्काळ लसीकरण करुन लसीकरण मोहिमेला प्रतिसाद देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील जे नागरिक दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत परंतु त्यांनी अद्यापही दुसरा डोस घेतलेला नाही अशा नागरिकांनी 15 डिसेंबरपर्यंत दुसरा डोस पूर्ण करावा, अन्यथा शासकीय पर्याय वापरून मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी म्हणाले, Omicron या विषाणुची प्रसारक्षमता लक्षात घेता त्याचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. ओमायक्रॉनचा तरुणांना होणार धोका लक्षात घेता, लसीकरणाचा एक डोस घेतलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रत्येक 15 दिवसाला व लसीकरणाची एकही मात्रा न घेतलेल्या विद्यार्थ्यांची प्रत्येक आठवड्याला RT-PCR तपासणी करण्यात यावी.

मंगल कार्यालयात समारंभाच्या वेळी पात्र नागरिकांना लसीकरण करावे. ज्या दुकानात, आस्थापनांत मालक आणि कामगारांचे दोन्ही डोस पूर्ण झाले असतील त्यांनी तसा फलक दुकानाबाहेर लावावा तसेच ज्या दुकानदारांनी स्वत:सह कामगारांचे लसीकरण पूर्ण केलेले नाही अशा दुकानांना सील करावे. कोविड-19 च्या अनुषंगाने कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर संबंधित विभागप्रमुखांनी योग्य ती कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.

२ लाख लसीकरण बाकी

औरंगाबाद शहरात १० लाख ५५ हजार ६०० लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ८ लाख ४४ हजार नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे, तर २ लाख ११ हजार नागरिकांनी एकही डोस घेतलेला नाही. पहिला डोस घेतला पण तीन महिने उलटूनही दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या ६७ हजार आहे. लसीकरण न झालेल्या लोकांकडून वसूल केल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेतील ५० टक्के रक्कम पोलिसांना तर ५० टक्के मनपाच्या फंडात जमा होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com