‘कौन कहता है मोहब्बत की जुबां होती है’

jalgaon-digital
3 Min Read

औरंगाबाद – aurangabad

स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी टाईप-२ (Spinal muscular atrophy type-2) (एसएमए-२) या दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या रुद्र भिसे याच्या उपचाराच्या खर्चासाठी आयोजित “हासिल ए महफिल’ला रसिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. ‘कौन कहता है मोहब्बत की जुबां होती है, ये हकीक़त तो निगाहों से बयान होती है…’  यासारख्या अजरामर गझलांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. यावेळी जमलेली वर्गणीची रक्कम मिळाल्याने रुद्रच्या पालकांचे डोळे पाणावले. या सहकार्यासाठी त्यांनी शहरवासीयांचे आभार मानले. (Rotary Club of Aurangabad Metro) रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रो आणि आस्था जनविकास संस्थेने (Astha Janvikas Sanstha) या आयोजनासाठी पुढाकार घेतला होता.

दहा वर्षाच्या रुद्र दयानंद भिसे यास जन्मत: असणाऱ्या एसएमए-२ आजाराच्या उपचारासाठी ५ कोटी रूपये खर्च अपेक्षीत आहे. त्याच्या कुटुंबियाला हा खर्च पेलवणारा नाही. शासनाकडूनही मदत मिळत नाहीय. उपचाराच्या खर्चातील खारीचा वाटा उचलण्यासाठी रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रो आणि आस्था जनविकास संस्थेने लोकवर्गणी जमा करण्यासाठी रविवारी आरती पाटणकर-आय्यंगर यांच्या “हासिल ए महफिल’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सभु महाविद्यालयाच्या गोविंदभाई श्रॉफ सभागृहात आयोजित कार्यक्रमात आमदार संजय शिरसाट, माजी उपममहापौर राजेंद्र जंजाळ, रोटरीच्या अध्यक्षा रो. मोना भूमकर, आस्थाच्या अध्यक्षा डॉ. आरतीश्यामल जोशी, जीआय वन हॉस्पिटलचे संचालक डॉ. मुकेश राठोड, सत्यविष्णू हॉस्पिटलचे संचालक डॉ. आय. जी. पटेल, प्रा. गजानन सानप यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.

सुरुवातीला आरती यांनी ‘कौन कहता है मोहब्बत की जुबां होती है, ये हकीक़त तो निगाहों से बयान होती है’ ही गझल सादर केली. यानंतर ‘तुमको देखा तो ये ख्याल आया’ आणि ‘ओठों को छू लो तूम’ या रचनांनी वातावरण गझलमय झाले. ‘रफ्ता-रफ्ता वो मेरे दिल के करीब आ गए’, ‘सलोना सा सजन है’, ‘बरसन लागी बदरीया’ आणि ‘मोहब्बत करने वाले कम ना होंगे’ या गझलांनी रसिकांना खिळवून ठेवले. तर ‘मै ख्याल हूं किसी और का’, ‘अपनी तस्वीर को आँखो से लगा था’ आणि ‘मेरे हमनफज मेरे हमनवाज दोस्त बन के’ या गझलांनी मैफलीला वेगळ्या उंचीवर नेले. आरती यांना गायनात कृतिका शेगावकर, धनंजय गोसावी, हार्मोनियमवर शांतीभूषण देशपांडे, तबल्यावर जगदीश व्यवहारे, की-बोर्डवर राजेंद्र तायडे तर गिटारवर श्रीराज कुलकर्णी साथसंगत केली. हसन सिद्दीकी यांच्या बहारदार निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली.

मोना भूमकर यांनी प्रास्ताविक तर डॉ.आरतीश्यामल आस्थाची माहिती दिली. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पीआर इम्पॅक्ट संस्थेने देखील सहकार्य केले. कार्यक्रमाला रोटेरियन मुकुंद कुलकर्णी, सुनील भूमकर, रागीनी कंदाकुरे, बाहेती, जीआय वन हॉस्पिटलचे डॉ. संदीप भालसिंग, डॉ. मुकेश राठोड, डॉ. वैभव गंजेवार, डॉ. अशोक मोहिते, डॉ. विनय झंवर यांची उपस्थिती होती.

उपचाराची रक्कम सुपूर्द

रुद्र याच्या उपचारासाठी रसिकांनी भरभरून वर्गणी रक्कम जमा केली. जमा झालेल्या वर्गणीच्या पेट्या रुद्रच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आल्या. ही रक्कम रुद्रच्या उपचारासाठी अनमोल असल्याचे त्याचे वडील दयानंद भिसे यांनी सांगीतले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *