
औरंगाबाद - aurangabad
सामाजिक जाणिवेचे भान ठेऊन लोकसहभागातून (Public participation) अकोल्यातील मोरणा व औरंगाबादच्या खाम नदीचे पुनरुज्जीवन केल्याबद्दल जलतज्ञ डॉ राजेंद्र सिंह यांनी जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय व त्यांच्या सहकार्याच्या कामाचे कौतुक करत या उपक्रमाचा आदर्श महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांनी घ्यावा, असे गौरवोद्गार काढले.
जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह हे जल यात्रेनिमित्त नाशिकहून औरंगाबाद येथे आले असता त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली ‘चला जाणूया नदीला’ व नदी पुनरुज्जीवन विकास प्रकल्पा बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
डॉ. सिंह म्हणाले की, आस्तिककुमार पाण्डेय यांनी लोकसहभागातुन अकोल्यातील मोरणा तसेच खाम नदीचा कायापालट केला. या नद्याचे पुनरुज्जीवन करत गतवैभव प्राप्त करुन दिले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशासकीय प्रशिक्षण देताना अशा प्रकारच्या सामाजिक कामाचेही प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. पाच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या नदी स्वच्छता अभियानाला आज मूर्त स्वरूप आले आहे याबद्दल आस्तिक कुमार पाण्डेय यांचे कार्य उल्लेखनिय असून या विकास कामाचा आदर्श इतरांनी घ्यावा असे सांगून डॉ सिंह म्हणाले की, देशाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना नद्यांच्या विद्रूपीकरण आणि दुर्दशेकडे लक्ष देण्याची गरज आहे. नद्यांच्या विकासासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येत नद्यांचे पावित्र्य राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले.