यंदा रिअल इस्टेट क्षेत्राची दमदार 'दिवाळी'

ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद 
यंदा रिअल इस्टेट क्षेत्राची दमदार 'दिवाळी'
USER

औरंगाबाद - aurangabad

सणाचा राजा असलेल्या दिवाळी अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे. जल्लोषात दिवाळी साजरी करण्यासाठी साऱ्यांचीच लगबग वाढली आहे. त्यात औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसह अन्य कर्मचाऱ्यांनाही बोनस, सानुग्रह अनुदान मिळाल्याने विविध वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत तोबा गर्दी झाली आहे. सराफा, कापड, होम अप्लायन्सेस व इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, वाहन बाजारासह रिअल इस्टेट क्षेत्रातही ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागल्याने सर्वत्र चैतन्य निर्माण झाले आहे.

पर्यटननगरी असलेल्या औरंगाबाद झपाट्याने विस्तारत आहे. पर्यटनासह शैक्षणिक सुविधा, औद्योगिक क्षेत्र त्यात होऊ घातलेले डीएमआयसी, स्मार्ट सिटी या कारणांनी शहराचे महत्व अधिक वाढले आहे. जळगाव रोड, दौलताबाद रोड, जालना, पैठण रोड तसेच बीड बायपास, वाळूज असे शहराच्या चारही बाजुने नागरी वस्त्या वाढत आहेत. परिमाणी, घरांची मागणीही त्यामुळे वाढल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले.

गृहनिर्माण क्षेत्रात सध्या बऱ्यापैकी फिलगुड वातावरण आहे. दसरा सणादरम्यान ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दिवाळी, पाडव्या सणादरम्यान त्यापेक्षाही अधिक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केला. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या १२ लाखांच्या घरापासून दिड ते दोन कोटीचे टुमदार बंगले शहर परिसरात बांधकाम व्यावसायिकांनी उभारले आहेत.

विविध गृह प्रकल्पांना ग्राहक भेटी देत असून गेल्या काही दिवसापासून बुकिंग जोमाने सुरू असल्याचे बांधकाम उद्योग क्षेत्रातील जाणकरांनी सांगितले. आपल्या गरजेनूसार फ्लॅट, रो -हाऊस, बंगला अशा घरांना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. शासकीय योजना, देण्यात आलेली सवलत तसेच बँकांनी गृहकर्जाच्या व्याजदर केलेली कपात यामुळे आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी असंख्य नागरिक आता पुढे येत असल्याचे त्यांनी नमूद केले असून दिवाळी रिअल इस्टेट क्षेत्रात भरीव अशी उलाढाल होईल, असा विश्वास व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com