'आनंदाचा शिधा' वाटपासाठी रेशन दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार

'आनंदाचा शिधा' वाटपासाठी रेशन दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार

राज्य सरकारचा निर्णय

औरंगाबाद - aurangabad

गोरगरीब नागरिकांसाठी आनंदाने व गोड पदार्थाने दिवाळी (diwali) साजरी व्हावी, यासाठी शासनाने “आनंदाचा शिधा' किटचे राज्यभर वाटप सुरू केले आहे.किट वाटपासाठी स्वस्त धान्य दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

या किटमध्ये १ किलो हरभरा डाळ, १ किलो साखर, १ किलो रवा, १ लिटर पामतेल यांचा समावेश आहे. दिवाळीनिमित्त जिल्ह्यात जवळपास साडेसहा लाख रेशन कार्डधारकांना १०० रुपयांमध्ये 'आनंदाचा शिधा'किट वाटप करण्याचे नियोजन आहे. रेशन कार्डधारकांना सुस्थितीत नसलेल्या कार्डाची दुय्यम प्रत आवश्यक ठिकाणी देण्याबाबतच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या आहेत.

राज्य शासनाने यंदा गरीब रेशन कार्डधारकांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेत ऐन दिवाळीत आनंदाचा शिधा रेशन दुकानांना वितरित केला आहे. शनिवारपासून शहरात त्या दिवाळी किटचे वाटप सुरू झाले आहे. परंतु साखर मागणीनुसार प्राप्त न झाल्याने अनेक दुकानांवर तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान हे किट घेण्यासाठी कार्डाधारकांनी दुकानांवर प्रचंड गर्दी केली असून भीमनगर भागात कार्डधारकांमध्येच हाणामारी झाल्याची माहिती नागरिकांनी दिली, जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने मागील आठवडाभरापासून 'आनंदाचा शिधा' उपलब्ध करण्यासाठी शासनाने नियुक्‍त केलेल्या कंत्राटदाराकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु शुक्रवारी रात्री हे पॅकेट पुरवठा विभागाला प्राप्त झाले. या मागणीपेक्षा अतिशय कमी प्रमाणात साखर उपलब्ध झाल्याने शिधा वाटप करावा तरी कसा, असा प्रश्न पुरवठा विभागापुढे निर्माण झाला होता. अखेर शनिवारी प्राप्त दिवाळी किट रेशन दुकानांवर उपलब्ध करून देत त्याच्या वाटपाला सुरुवात करण्यात आली.

शहरात रविवारी सर्वच रेशन दुकानांवर दिवाळी किट घेण्यासाठी ग्राहकांनी तोबा गर्दी केली होती. अनेक ठिकाणी रांगांमध्येच ग्राहक एकमेकांना लोटालोटी करीत असल्याचे प्रकार अढळून आले. तर भावसिंगपुरा-भीमनगर परिसरातील एका रेशनदुकानावर ग्राहकांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला. त्यामुळे रेशन दुकानदाराने उपस्थित सर्व रेशन कार्डधारकांचे कार्ड जमा करून घेत त्यांना एक-एक करून बोलावून दिवाळी किट वितरित केली. एका पिशवीमध्ये हे चारही पॅकेट देण्यात आले.

किट नसल्याने दुकान बंद

शहरातील काही रेशन दुकानांवर रविवारी सकाळपर्यंत दिवाळी फूड किटमधील चारपैकी दोन तर कुठे तीन पॅकेटच उपलब्ध झाले होते. त्यामुळे या दुकानदारांनी दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवली होती. या छावणी, बिडकीन यासह ग्रामीण भागातील काही रेशन दुकानांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी साखरेची प्रतीक्षा होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com