औरंगाबादेत पुढील 48 तास पावसाचा मुक्काम

तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम
औरंगाबादेत पुढील 48 तास पावसाचा मुक्काम

औरंगाबाद - Aurangabad

दक्षिणेकडील भागात प्रवेश करणार्‍या तौक्ते चक्रीवादळामुळे रविवारी शहर व जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. उन्हाळ्यातील उकाड्यातून त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे बराच दिलासा मिळाला. दरम्यान, या पावसामुळे शहराच्या विविध भागात वारंवार वीज गुल झाल्याने नागरिकांची अडचण झाली.

राज्यातील दक्षिण समुद्री किरणपट्टीवर तौक्ते चक्रीवादळ धडकले आहे. 18 मे रोजी गुजरातकडे हे चक्रीवादळ झेपावणारे आहे. दरम्यान, या चक्रीवादळामुळे मराठवाड्याच्या हवामानात बदल झाला आहे. मान्सूनसाठी अद्याप वेळ असला तरी या चक्रीवादळामुळे मे च्या मध्यावर बरसणार्‍या या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा दिला आहे. रविवारी सकाळपासून ऊनसावलीचा खेळ सुरु होता.

दरम्यान, सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुरु होऊन साडेपाचच्या सुमारास रिमझिम पावसाने हजेरी लावली. काही वेळातच पावसाने जोरदार रूप धारण केले. वृत्त लिहेपर्यंत सायंकाळी 6 पर्यंत हा पाऊस सुरु होता. एमजीएम वेधशाळेचे: संचालक शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पाऊस पूर्व मान्सून, अवकाळी किंवा पूर्व मोसमी पावसात मोडणारा नाही. तर तो तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम आहे. पुढील 48 तास मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना जिल्ह्यात या पावसाचा अधिक जोर राहणार आहे. सोबतच पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीत देखील या पावसाची हजेरी राहणार आहे. रविवारी औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक ठिकाणी हा पाऊस बरसला.

सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरात 18.8 मिमी पावसाची नोंद एमजीएम वेधशाळेने केली आहे. शहरात हवेची गती 24 तर शहर परिसरात 66 किलोमीटर प्रतितास नोंदली गेली. पुढील 48 तास या पावसाची हजेरी अनुभवयाला मिळणार असून, शहरवासीयांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com