मराठवाड्यात येत्या दोन दिवसांत पावसाचे आगमन!

मराठवाड्यात येत्या दोन दिवसांत पावसाचे आगमन!

जायकवाडीत ३२ टक्के पाणीसाठा

औरंगाबाद-Aurangabad

मराठवाड्यात पावसाची दडी कायम असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाणीसाठ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची भीती आहे. दोन दिवसांत विभागात पावसाचे आगमन होण्याचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. हा पाऊस मागील तूट भरून काढण्याची शक्यता आहे.

मागील आठ दिवसांपासून पाऊस पूर्णत: थांबला आहे. रिमझिम पावसाची शक्यता मावळल्याने खरीप हंगामावर चिंतेचे सावट पसरले आहे. विभागात २७ जून रोजी काही भागात मुसळधार पाऊस झाला होता. तेव्हापासून पावसाची उघडीप कायम आहे. परभणी, जालना, बीड, लातूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत समाधानकारक पाऊस पडला आहे. मात्र, सद्यस्थितीत विभागातील आठही जिल्ह्यात पावसाची दडी कायम आहे. कापूस, मका, सोयाबीन पिकाची लागवड पूर्ण झाली आहे.

या पिकांना पाऊस नसल्याने फटका बसला आहे. फुलंब्री, सिल्लोड, कन्नड तालुक्यात पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी खरीप पिकाला पाणी दिले आहे. मात्र, इतरत्र पिकांची वाढ खुंटली आहे. उस्मानाबाद, हिंगोली, लातूर जिल्ह्यातही पिकांचे नुकसान झाले आहे. आणखी आठ दिवस पावसाची दडी कायम राहिल्यास दुबार पेरणी करावी लागण्याची भीती आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. आता पेरणी झालेल्या भागात शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.

जायकवाडीत ३२ टक्के पाणी

जूनच्या मध्यमापासून आतापर्यंत पाऊस नसल्याने धरणातील पाणीसाठा घटला आहे. जायकवाडी धरणात ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. निम्न दुधना (५९), येलदरी (५६.४७), सिद्धेश्वर (१८.३५), माजलगाव (२०), मांजरा (१७), पेनगंगा (४९), मानार (३७.२२), निम्न तेरणा (४०), विष्णुपुरी (८६ टक्के) पाणीसाठा आहे. मध्यम आणि लघु प्रकल्पाने तळ गाठला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com