
औरंगाबाद - aurangabad
येणार... येणार म्हणून प्रतीक्षा सुरू असलेल्या मृगाच्या (rain) पावसाचे गुरुवारी सायंकाळी दणक्यात आगमन झाले. सायंकाळी ६ वाजता वादळी वार्याने पावसाच्या आगमनाची वर्दी दिली. मात्र, शहरात दाणादाण उडाली. तासभर मनसोक्त बरसलेल्या पावसाने शहराला चिंब भिजविले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरूच होता. त्यामुळे शहरातील वाहतूक धिमी झाली होती.
मान्सून केरळात आला, तो आता पुढे सरकला, वातावरण अनुकूल नसल्याने तो तेथे अडकला...' यासारख्या बातम्या आठवडाभरापासून होत्या. त्यानंतर हवामान खात्याने मध्य महाराष्ट्रासह राज्यातील काही भागांत मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज व्यक्त केला.
मराठवाड्यातील नांदेड, हिंगोलीसह अनेक भागांत झालेल्या जोरदार पावसाने हा अंदाज खारा ठरला. मात्र, औरंगाबादवर या मान्सूनपूर्व पावसाने मेहरबानी केली नव्हती. त्यामुळे पावसाचे आगमन कधी होणार, याची सर्वांनाच आतुरता लागली होती. ६ जून रोजी शहरातील काही भागांत तुरळक पावसाचे हजेरी लावली होती. त्यामुळे पावसाळ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे ७ जूनला पाऊस येणार, असा अंदाज सर्वांनीच बांधला होता. मात्र, दोन दिवस पावसाचे आगमन तर सोडाच कुठलीही शक्यता दिसून येत नव्हती. गुरुवारी सकाळपासून नेहमीप्रमाणे निरभ्र आकाश आणि ऊन असे वातावरण होते. त्यामुळे पावसाचे आगमन किती दिवस लांबणार, असा प्रश्न सर्वांना पडला होता. दरम्यान, सायंकाळी ५ वाजेपासून अचानक वादळी वार्याने धुमाकूळ सुरू केला. शहराची दाणदाण सुरू असतानाच आकाशात ढगांची गर्दी होऊ लागली. ऊन आणि उकाडा असलेले वातावरण एमदम बदलून गेले आणि सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत थांबून थांबून का होईना जोरदार पाऊस झाला.
पहिल्या पावसात बत्ती गुल!
सायंकाळी झालेल्या या वादळी पावसाने अनेक भागांतील वीजपुरवठा बंद झाला होता. चिकलठाणा, पडेगाव, पावरहाऊस, हर्सूल परिसर, छावणी, मिलकॉर्नर, नंदनवन कॉलनी, लक्ष्मी कॉलनी, पेन्शनपुरा, गबळीपुरा, भुजबळनगर, शांतीपुरा, बिल्डर्स सोसायटी, भावसिंगपुरा, पेठेनगर, श्रावस्ती कॉलनीसह शहरातील अन्य भागातील वीजपुरवठा बंद झाला. शहरातील विविध भागांत लाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे महावितरणचे अधिकारी, अभियंते, कर्मचाऱ्यांनी आपापल्या भागातील लाईन फॉल्ट शोधून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. फॉल्ट शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू करून दुरुस्तीचे काम करण्यात आल्याचे शहर अधीक्षक अभियंता यांनी सांगितले.