'नो व्हॅक्सिन, नो पेट्रोल'मुळे वाहनांच्या रांगा

'नो व्हॅक्सिन, नो पेट्रोल'मुळे वाहनांच्या रांगा

काही ठिकाणी वादावादी

औरंगाबाद - aurangabad

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी शहरातील एक (Petrol pump) पेट्रोलपंप सील करण्याचे आदेश देताच, सोमवारी शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर 'नो व्हॅक्सिन नो पेट्रोल' अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली. लस घेतल्याचे प्रमाणपत्र पाहूनच, वाहनधारकांना पेट्रोल घेण्यासाठी सोडण्याची कार्यवाही करण्यात आली. या कार्यवाहीमुळे अनेक पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी, रविवारी सायंकाळी महावीर चौकातील बाबा पेट्रोल पंपाची पाहणी केली. या पंपावर कोव्हिड नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. त्यानंतर त्यांनी पंप सील करण्याचे आदेश दिले. हे पंप सील करण्याची कारवाई रविवारी रात्री करण्यात आली. या कारवाईनंतर औरंगाबाद पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनकडून सोमवारपासून सर्व पेट्रोल पंपावर 'नो व्हॅक्सिन नो पेट्रोल'बाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार शहरात सोमवारी सकाळपासूनच शहरातील जवळपास सर्व पंपांवर लशीबाबतचे प्रमाणपत्र दाखवून पेट्रोल देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली.

या कार्यवाहीमुळे अनेक ठिकाणी पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांना परत पाठविण्यात आले. पेट्रोल भरण्यासाठी पंपावर प्रमाणपत्र तपासण्यासाठी एक कर्मचारी नेमण्यात आला होता. प्रमाणपत्र पाहणे व तोच व्यक्ती आहे किंवा नाही. याची तपासणी करण्यात येत होती. प्रत्येक वाहनधारकांची अशी तपासणी केली जात असल्याने आधी प्रमाणपत्र तपासणीसाठी रांगेत उभे राहावे लागले. त्यानंतर पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागले. यामुळे अनेक वाहनधारकांनी याबाबत पंपचालकांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली.

अहवाल चालेल का?

दरम्यान, एका पंपावर एक मुलगी महाविद्यालयात जाण्यासाठी आली. ती रांगेत उभी राहिली. तिचा नंबर आल्यानंतर तीला पंपावरील कर्मचाऱ्याने लस प्रमाणपत्र मागितले. तिने ते नसल्याचे सांगितले. मात्र, कोरोना नसल्याचा चाचणी अहवाल असल्याचे तिने सांगितले. लसीचे प्रमाणपत्रच पाहावे, असे आम्हाला आदेश असल्याने प्रमाणपत्राशिवाय पेट्रोल मिळणार नसल्याचे कर्मचाऱ्याने सांगितल्यानंतर त्या मुलीला तेथून बाहेर पडावे लागले.

काही ठिकाणी वादावादी

पेट्रोल पंपचालकांनी लस प्रमाणपत्र सक्ती केल्यामुळे शहरातील काही पंपावर पंप कर्मचाऱ्यांसोबत वादावादी झाल्याचीही माहिती समोर येत आहे. आजारपणातून उठल्यानंतर लस घेता येत नाही. केंद्रात गर्दी असल्याने लस घेतली नाही, याशिवाय इतर कारणे सांगून अनेक वाहनधारकांनी पंप चालकांसोबत वाद घातल्याची माहिती असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com