Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedयुरियाचा 33 टक्के संरक्षित साठा मुक्त

युरियाचा 33 टक्के संरक्षित साठा मुक्त

औरंगाबाद – Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात झालेला पाऊस, पेरण्या, खताचा पुरवठा यांचा आढावा घेत युरियाचा 33 टक्के संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हास्तरीय संरक्षित खत साठा संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी मान्यता दिली आहे.

- Advertisement -

जिल्हास्तरीय संरक्षित खतसाठा संनियंत्रण समितीची बैठक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, एमएआयडीसीचे विभागीय व्यवस्थापक दीपक चव्हाण, श्रीमती डी.आर.भडीकर, कृषी साहित्य विक्रेता संघटनेचे अध्यक्ष राकेश सोनी, विक्रेते यांचे प्रतिनिधी, खत कंपनीचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा होऊ नये यासाठी 10 हजार 196 मे. टन युरिया खताचा संरक्षित साठी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी 6 हजार 668 मे. टन इतका संरक्षित साठा महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग महामंडळ यांच्यामार्फत करण्यात आला होता. औरंगाबाद जिल्ह्यास संपूर्ण खरीप हंगामासाठी 99 हजार 450 मे. टन युरिया खताचे आवंटन मंजूर आहे. जुलैअखेर 68 हजार 621 मे. टन मंजूर आहे. 22 जुलै अखेर 65 हजार 224 मे. टन युरियाचा पुरवठा झालेला आहे. संरक्षित खत साठा मुक्त करताना तालुकानिहाय ज्या भागात युरियाची उपलब्धता कमी आहे तेथे खताची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. युरियाचे वितरण करताना महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाने ज्या विक्रेत्याकडे 15 टनापेक्षा कमी युरिया शिल्लक आहे. अशा विक्रेत्यांमार्फत शेतकऱ्यांना विक्री करावा. तसेच समान व व्यापक वितरणासाठी एका विक्रेत्यास 10 टनापेक्षा जास्त युरिया वितरीत करण्यात येऊ नये, असा निर्णयही घेण्यात आला. याशिवाय आगामी 10 दिवसात येणाऱ्या रेकचा आढावा घेण्यात आला. त्यातूनही जिल्ह्यात जास्तीत-जास्त व सर्व भागात युरियाचे वितरण होईल, असे नियोजन करण्याच्या सूचना सर्व खत कंपन्या व विक्रेत्यांना देण्यात आल्या.

जिल्ह्यामध्ये 14 हजार 500 मॅट्रिक टन इतका साठा किरकोळ विक्रेत्यांकडे उपलब्ध असून सद्यस्थितीत पिकांची दुसरा डोस साठीची गरज लक्षात घेऊन येणाऱ्या रॅक चे नियोजन लक्षात घेऊन संरक्षित साठा मधून मार्केटमधील पुरवठ्याची स्थिती अजून उत्तम करण्यासाठी दोन हजार 200 मेट्रिक टन एवढ्या युरियाचा संरक्षित साठा मुक्त करण्यात आला आहे. युरिया खताचा पुरेसा साठा बाजारात उपलब्ध ठेवण्यासाठी संरक्षित साठाचे नियोजन अत्यंत बारकाईने करण्यात येत असून कुठेही खतांची उपलब्धता कमी पडणार नाही याचे नियोजन करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी युरियाच्या पुरवठ्याबाबत निश्चिंत राहावे. योग्यप्रकारे युरिया खताचा वापर करावा. तसेच त्याबाबत काही तक्रार असल्यास कृषी विभागास संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या