औरंगाबादमध्ये पोलीस यंत्रणा सुस्त

शहरात नियमांचे उल्लंघन
औरंगाबादमध्ये पोलीस यंत्रणा सुस्त

औरंगाबाद - Aurangabad

कोरोनाला (Corona) रोखण्यासाठी महापालिका प्रशासन निरंतर सतर्कतेची भूमिका मागील दीड वर्षांपासून बजावत आहे. दुसर्‍या लाटेच्या सुरूवातीच्या काळातील अनुभव पाहता ती ओसरल्यानंतरही तिसर्‍या लाटेला रोखण्यासाठी कोरोना चाचण्यांची मोहीम प्रशासनाने नियमित चालू ठेवलेली आहे. आजघडीला शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह रोजच्या दीड हजार व त्यापेक्षा अधिक चाचण्या केल्या जात आहेत. मात्र दुसरीकडे पोलीस यंत्रणा सुस्त दिसून येत आहे. बाजारपेठांतील वाढती गर्दी, आंदोलनात होणारे कोरोना नियमांचे उल्लंघन याविरोधात पोलीस प्रशासन (Police administration) कडक भूमिका घेताना दिसून येत नाही.

देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या डेल्टा प्लस या विषाणूचा संसर्ग सुरू झाला आहे. डेल्टा प्लसमुळे तिसरी लाट अधिक संसर्गजनक राहील, असा अंदाज आरोग्य तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे. सोबतच तिसर्‍या लाटेत लहान बालकांना अधिक धोका असण्याचाही अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने राज्यात मध्यंतरी शिथीलता दिल्यानंतर पुन्हा काही प्रमाणात कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच लहान मुलांच्या बचाव व उपचारासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पालिकेने शहरात गरवारे हॉल व एमजीएम कॅम्पसमध्ये असे दोन कोविड बाल रुग्णालये उभारण्याची तयारी सुरू केलेली आहे. बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती घेत पालिकेने आठ डॉक्टरांची टीम तयार ठेवली आहे.

सोबतच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने शहराच्या सहा प्रवेशद्वारांवर कायम कोरोना चाचणी पथके तैनात ठेवली आहे. रेल्वेस्टेशन, विमानतळ यासह शहरातील 9 शासकीय कार्यालयांत रोजची प्रवाशी व अभ्यांगतांची चाचणी केली जात आहे. सोबतच रोज शहरात नव्याने आढळणार्‍या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्‍तींच्या मोबाइल टीमद्वारे चाचणी केली जात आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसर्‍या लाटचा संभाव्य धोका लक्षात घेता रुग्णांची संख्या घटली तरी दीड हजारपेक्षा अधिक व्यक्‍तींची कोरोना चाचण्या केल्या जात आहे. दुसरीकडे लसीकरणाची मोहीमही लस उपलब्ध होईल, त्या प्रमाणात गतीने राबवली जात आहे.

राज्य तसेच केंद्र सरकारविरोधात शहरात विविध राजकीय व सामाजिक संघटना मागील काही दिवसांपासून आंदोलने करताना दिसत आहेत. या आंदोलनांत कोरोना नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. दरम्यानच्या काळात अलीकडेच झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची औपचारीकता पोलिसांनी दाखवली आहे. मात्र यापूर्वी भाजपसह अन्य संघटनांनी केलेल्या आंदोलनात नियमांचे उल्लंघन झाल्यानंतरही पोलीस प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतलेली दिसून आली.

शहरासह दुपारी चार वाजेनंतर जमावबंदी आदेश जागू आहेत. त्याचे कटाक्षाने पालन करण्याप्रती आवश्यक कारवाई करण्यात पोलिसांची यंत्रणा शहरात कर्तव्यदक्ष दिसून येत नाही. तसेच अनलॉकच्या मुदतील बाजारपेठांत गर्दीला प्रतिबंध करण्याची जबाबदारी देखील पालिकेपेक्षा पोलीस प्रशासनाची अधिक आहे. त्याकडेही पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. प्रशासनाची ही चूक कोरोनाची तिसरी लाटेला निमंत्रण देणारी ठरू शकते. आता यंत्रणेने वेळीच सावध होणे गरजेचे आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com