कवितांच्या पावसात रसिक चिंब!

‘अक्षरलेणं’ समूहाचा उपक्रम
कवितांच्या पावसात रसिक चिंब!

औरंगाबाद - aurangabad

पहिला पाऊस (rain) पडला आणि मृद्गंध दरवळला की बहुतेक प्रत्येक माणूस मृण्मय होतो. पर्जन्याच्या रूप-गंध-स्पर्शाने कलावंत मोहरतो. पाऊस ही चीजच इतकी विलोभनीय आहे की ती मनामनात आनंद दरवळतो. या पावसांचे मोहक रुप आज कविता, गीतांच्या माध्यमातून शहरवासियांनी अनुभवले. शहरातील ‘अक्षरलेणं’ या समूहाच्या वतीने या दिवशी पाऊस कविता अभिवाचन कार्यक्रम एमजीएम परिसरात क्लोवरडेल शाळेच्या श्रावस्ती सभागृहात पार पडला.

यंदा या कार्यक्रमाचे दहावे वर्ष होते. बाहेर पडणारा पाऊस आणि पावसांच्या कविता, गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली. सुधीर मोघे यांनी आपल्या भावस्पर्शी स्वरात गजल गिरीश यांची मेघदूताशय, बा.भ. बोरकर यांची मेघसा, इंद्रजीत भालेराव यांची भूमीचे मार्दव, निलेश पाटील यांची हिरव्या वाटेवर या कविता सादर करत पावसाचे सप्तरंग उधळले.

अश्विनी दाशरथे यांनी मंगला रोकडे यांची धरतीचा कलाकार, हनुमंत चांदगुडे यांची गढूळ डव्हात, हर्षवर्धन दीक्षित यांनी ऐश्वर्य पाटेकर यांची असा रंगारी श्रावण, शैलेश हिंदळेकर यांची पाऊस रुसंल, हर्षवर्धन आणि अश्विनी यांनी केदार खाडिलकर यांची चहा कॉफी ही कविता एकत्रित सादर केली. रेवा जोशी हिने अलका यांची पावसाचं वर्णन करणारी कविता सादर करून विशेष दाद मिळवली. पंडित विश्वनाथ दाशरथे यांनी आपल्या मखमली स्वरात शास्त्रीय संगीतावर आधारित पावसाची विविध रुप दाखवणारी ज्यात नभ मेघांनी आक्रमिले,ती गेली तेव्हा रिमझिम या गीतांसह (Hyderabad) हैदराबादच्या निर्मला जोशी यांनी लिहिलेलं पावसांचे पसायदान सादर केले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ मंगला वैष्णव उपस्थित होत्या त्यांनी इंदिरा संत यांची पाऊस कोसळतो अधांतरी ही कविता सादर केली. अनुराधा कदम, एमजीएम स्कूल्सच्या संचालक डॉ. अपर्णा कक्कड यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते. अक्षरलेणं च्या या दहा वर्षांच्या वाटचालीत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे डॉ.वैष्णव तसेच कदम यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. ज्यात पत्रकार डॉ.आरतीश्यामल जोशी,रोशनी शिंपी यांच्यासह आदींचा समावेश होता. काव्यरसिकांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com