जिल्हा सामान्य रुग्णालयात 50 खाटांचे 'पीआयसीयू'

व्हेंटिलेटरचीही सुविधा
जिल्हा सामान्य रुग्णालयात 50 खाटांचे 'पीआयसीयू'

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद शहरात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर चिकलठाणा परिसरातील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 50 खाटांचे 'पीआयसीयू' (PICU) व 'एनआयसीयू' सज्ज केले जाणार आहे. अर्थात, रुग्णालयाचा एक संपूर्ण मजला बालरुग्णांसाठी, तर एक मजला प्रौढ रुग्णांसाठी सज्ज असेल, असे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाकडून सज्जता केली जात आहे आणि तिसऱ्या लाटेत बालरुग्णांची संख्या जास्त असू शकते, अशीही शक्यता यापूर्वी व्यक्त झाली आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये (District General Hospital) एक संपूर्ण मजला बालरुग्णांसाठी राखीव असेल.

यामध्ये 40 खाटांचे 'पीआयसीयू' असेल, तर 10 खाटांचे 'एनआयसीयू' असणार आहे. तसेच, रुग्णालयाचा एक संपूर्ण मजला प्रौढ रुग्णांसाठी राखीव असणार आहे. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयामध्ये बहुतांश खाटांना ऑक्सिजनची सुविधा व गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटरचीही सुविधा आहे. मात्र, संभाव्य तिसऱ्या लाटेत रुग्णालयातील गंभीर बालरुग्णांना व गंभीर नवजात शिशुंना सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) हलवण्यात येऊ शकते आणि सौम्य व मध्यम तीव्रता असलेल्या बालरुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येऊ शकतील.

प्रौढ रुग्णांच्या बाबतीतही अशीच विभागणी असू शकते. संभाव्य तिसऱ्या लाटेची रुग्णालयामध्ये तयारी केली जात आहे व ऑगस्टअखेरपर्यंत रुग्णालयामध्ये 40 खाटांचे 'पीआयसीयू' व 10 खाटांचे 'एनआयसीयू' सज्ज असेल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com