छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar
वयोवृद्ध कलावंतांना मानधन देण्यात यावे या मागणीच्या पूर्ततेसाठी मोहन हैबती कोलते व इतर कलावंतांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असून खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे व न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांनी राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयासह (Ministry of Culture) सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
याचिकेनुसार महाराष्ट्र शासनाच्या दि. २ ऑगस्ट २०१० रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील प्रत्येक जिल्यातून प्रत्येक वर्षी एकूण ६० (साठ) कलावंतांची निवड करून त्यांना मानधन दिले जाते. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वयोवृद्ध कलावंतांनी शासनाकडे मानधनासाठी सन २०१० पासून अर्ज दाखल केलेले असून शासनाने सदरील कलावंतांचे अर्ज निकाली काढलेले नाहीत. त्यामुळे मोहन हैबती कोलते व इतर कलावंतांनी अँड. एस. एम. पंडित यांचेमार्फत ही याचिका दाखल केलेली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील, छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापुर, वैजापुर, कन्नड, फुलंब्री, व सिल्लोड तसेच सोयगाव तालुक्यातील वृद्ध कलावंतांनी मानधन मिळण्यासाठी सन २०१० पासून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करून शासनाकडे प्रस्तावा सादर केलेले आहेत. सांस्कृतिक व पर्यटन विभाग मंत्रालय मुंबई, मुख्य कार्यकारी अधिकारी छत्रपती संभाजीनगर, गटविकास अधिकारी जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती तसेच वयोवृद्ध मानधन निवड समितीचे पदाधिकारी यांनी याचिकाकर्त्यांची निवड केलेली नाही, असे याचिकेत म्हटले आहे.
अँड. पंडित यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, शासन निर्णयानुसार प्रत्येक वर्षी, प्रत्येक जिल्ह्यातून ६० कलावतांची निवड करून त्यांना मानधन देण्याची तरतूद आहे. सन २०१० पासून तत्कालीन वयोवृद्ध कलावंत निवड समिती अध्यक्ष शेषराव महादू गाडेकर यांनी शासनास पत्र देऊन ११७ कलावंतांचे अर्ज (यादीसह देऊन) मंजूर करण्याची विनंती केली होती. परंतु, त्यावर निर्णय झाला नाही.