Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedलस न घेता रस्त्यावर फिरणार्‍यांना होणार दंडात्मक कारवाई

लस न घेता रस्त्यावर फिरणार्‍यांना होणार दंडात्मक कारवाई

औरंगाबाद – Aurangabad

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने आता 45 वर्षावरील नागरिकांचा लसीकरणाचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. या वयोगटातील सुमारे तीन लाख नागरिक लसीकरणापासून अद्यापही दूर आहेत. या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण व्हावे, या दृष्टीने पालिकेकडून प्रयत्न केले जात आहे. त्याअंतर्गतच आता लस न घेता रस्त्यावर फिरणार्‍या नागरिकांना दंड लावण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

- Advertisement -

महापालिकेच्या माध्यमातून शहरात आजवर 3 लाख 11 हजार 466 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. पालिकेने 115 वॉर्डांत लसीकरण मोहीम सुरू केल्यानंतर लसीचा तुटवडा निर्माण झाला. त्याबरोबरच कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतरही 84 दिवसांचे झाले. त्यामुळे 45 वर्षावरील नागरिकांची लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी कमी झाली. या संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, शहरात 45 वर्षावरील सुमारे साडेचार ते पाच लाख नागरिक आहेत. त्यापैकी पावणे दोन लाखांपेक्षा कमी नागरिकांनी लस घेतली आहे.

उर्वरीत 3 लाख नागरिक लसीकरणापासून अद्यापही दूर आहेत. आता लसीकरणाला प्रतिसाद मिळावा म्हणून ड्राईन इन ही मोहिम राबवली जाणार असून दिव्यांग आणि ओळख नसलेल्या व्यक्तींचेही लसीकरण करण्यात येणार आहे. 45 वर्षावरील वयोगटातील नागरिकांनी लस घेतलीतर कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी कोरोनाला रोखण्यासाठी लस न घेता रस्त्यावर फिरणार्‍या व्यक्तींना दंड लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. बाजारपेठ व मुख्य रस्त्यावर मनपाच्या नागरिक मित्र पथकाकडून नागरिकांनी लस घेतली किंवा नाही याची तपासणी केली जाईल. लस न घेता फिरत असेल तर त्यांना दंड केला जाईल, असे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

आता दिव्यांगांसह कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नसलेल्या व्यक्तींचे लसीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी नऊ प्रभाग कार्यालयांच्या क्षेत्रात नऊ लसीकरण केंद्रांचे नियोजन पालिका करत आहे. लसीकरणापासून कोणीही वंचित राहू नये, या हेतूने हे नियोजन केले आहे. संबंधित केंद्रांवर केवळ दिव्यांग व्यक्ती व ओळखपत्र नसलेल्या व्यक्तींचेच लसीकरण केले जाणार आहे.

पालिकेने दिव्यांग व्यक्तींची नोंद केली आहे. साडेतीन हजार दिव्यांग व्यक्तींनी पालिकेकडे स्वत:ची नोंदणी केली आहे. मात्र त्यांची संख्या दहा हजारांच्या घरात असल्याचे मानले जात आहे, त्यानुसार आता लसीकरणाचे नियोजन केले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या