Monday, April 29, 2024
HomeUncategorizedरुग्णाला बसवला रक्तात विरघळणारा स्टेंट

रुग्णाला बसवला रक्तात विरघळणारा स्टेंट

औरंगाबाद – aurangabad

अँजिओप्लास्टी (Angioplasty) झालेल्या एका रुग्णाच्या रक्तवाहिन्यांमध्ये “बायो अ‍ॅब्सॉर्बल’ (Bio absorbable) म्हणजेच रक्तात विरघळणारा स्टेंट बसविण्याची यशस्वी शस्त्रक्रिया डॉ.हेडगेवार रुग्णालयात (Dr. Hedgewar Hospital) नुकतीच करण्यात आली. दोन ते तीन वर्षात हा स्टेंट विरघळून जाईल आणि रुग्णाला स्टेंटमुक्त आयुष्य जगता येईल. प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.महेश देशपांडे यांनी “बायो अ‍ॅब्सॉर्बल’ बसविण्याची मराठवाड्यातील ही पहिली शस्त्रक्रिया केली असून भारतीय कंपनी मेरील लाईफ सायन्सेसने स्टेंटची निर्मिती केली आहे.

- Advertisement -

अंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांच्या हृदयाला रक्त पुरवणाऱ्या रक्तवाहिनीत एक छोटी नळी म्हणजेच स्टेंट बसवावे लागते. रक्तवाहिनी अरूंद झालेल्या जागेवर अंजिओप्लास्टी करून ती रूंदावल्यावर तेथे रक्ताची गुठळी होऊ नये म्हणून स्टेंट बसवले जाते. आजवर धातूपासून तयार केलेले स्टेंट बसवले जात होते. मात्र, हे स्टेंट आयुष्यभर शरीरात राहतात. त्याचे घातक परिणाम भविष्यात जाणवतात. त्यास “बायो अ‍ॅब्सॉर्बल किंवा बायो रिसोर्सेबल’ स्टेंट सशक्त पर्याय म्हणून समोर आल्याची माहिती डॉ.महेश देशपांडे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

डॉ.देशपांडे म्हणाले, सहा महिन्यांपूर्वी एक रुग्ण हृदयरोगाची तक्रार घेऊन हेडगेवार रुग्णालयात आला. त्यास अंजिओप्लास्टीची गरज होती. आम्ही त्यास धातू ऐवजी विरघळणारी स्टेंट बसविण्याबाबत समुपदेशन केले. रुग्णाने संमती दर्शविल्यानंतर ही शस्त्रक्रिया पार पडली. १ जानेवारी रोजी शस्त्रक्रियेस सहा महिने झाले. या काळात विविध चाचण्यांतून शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यावर शिक्कामोर्तब झाले. सहा महिन्यात स्टेंट रक्तात विरघळण्यास सुरुवात झाली असून २ वर्षात ही प्रक्रिया पूर्ण होईल. विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेनंतर दोन ते तीन वर्षांनी रक्त पातळ करण्याची गोळी घेण्याची गरज राहत नाही, असा विश्वास डॉ. देशपांडे यांनी व्यक्त केला.

मेरील लाईफ सायन्सेसच्या “मेरीस १००’ या बायो रिसोर्सेबलची निर्मिती पॉली-एल-लॅक्टाईड या विशिष्ट पॉलीमरपासून केली आहे. याच पॉलीमरपासून विरघळणारे टाकेही तयार केले जातात. बायो रिसोर्सेबल स्टेंट रक्तात विरघळून गेल्याने भविष्यात याचा धोका राहत नाही. विशेषत: तरुण रुग्णांसाठी तो लाभकारक ठरते. ब्लॉक असलेल्या रक्तवाहिन्या सामान्य ठेवून त्या पुन्हा ब्लॉक होऊ देण्यास प्रतिकार करतो. औषध नियंत्रण महासंचालक (डीसीजीआय) आणि सीईची या स्टेंटला मान्यता आहे. भारतात आणि परदेशातही मेरीस १०० चे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत.

डॉ. देशपांडे म्हणाले, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग (सीव्हीडी) भारतात मृत्यूचे प्रमुख कारण ठरत आहेत. भारतीय तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका पाश्चिमात्य देशापेक्षा दुप्पट आहे. बदललेली जीवनशैली, जंक फुड, ताण-तणाव, व्यायामाचा अभाव यामुळे हा धोका वाढत आहे. अगदी तिशी-चाळीशीतील तरुणांनाही ह्रदयरोगाला सामोरे जावे लागत आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्याने रोगाचे निदान होण्यात उशीर होतो व गुंतागुंत वाढत जाते. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

याप्रसंगी डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेश देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजश्री रत्नपारखे, हृदयरोग विभाग प्रमुख डॉ. रेणू चौहान यांची उपस्थिती होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या